जाहिरात

Beed Crime: तू काळी, पांढऱ्या पायाची... विवाहितेची निर्घृण हत्या, मृतदेह विहिरीत; भयंकर घटनेने बीड हादरलं

मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Beed Crime: तू काळी, पांढऱ्या पायाची... विवाहितेची निर्घृण हत्या, मृतदेह विहिरीत; भयंकर घटनेने बीड हादरलं

आकाश सावंत, बीड: 

Beed Crime: तू काळी आहेस.. स्वयंपाक येत नाही.. पांढऱ्या पायाची आहेस... असे म्हणत विवाहितेचा अमानुष छळ करत तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. संध्या घुले असं या 23 वर्षीय विवाहितेचे नाव असून एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर हे प्रकरण समोर आले. याबाबत पतीसह सासू, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News: गांजा तस्करी करताना मॉडेलला अटक; मुंबई विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई

विवाहितेची निर्घृण हत्या

समोर आलेल्या माहितीनुसार,  बीडच्या कुटेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका विहिरीत 23 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. विवाहितेच्या डोक्यात गंभीर जखम दिसून आली. याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता  सासरच्यांनीच महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संध्या किसन घुले हिचा 20 मे 2022 रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्याशी विवाह झाला होता. लग्नात चार लाख रुपये हुंडा आणि एक तोळा सोने देऊनही लग्नानंतर काही दिवसातच सासरच्यांनी तिचा मानसिक छळ केला. तू काळी आहेस.. स्वयंपाक येत नाही.. पांढऱ्या पायाची आहेस... असे म्हणत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सासरच्यांनी सुरू ठेवला. तसेच माहेराहून ऑटो रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. त्यामुळे सासरच्या छळाला कंटाळून विवाहित महिला तीन महिने माहेरी आली होती. परंतु दीड वर्षांच्या मुलासाठी समजूत काढून संध्याला पुन्हा सासरी पाठवण्यात आले. 

(नक्की वाचा-  Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)

अशातच 8 जून रोजी संध्याची चप्पल घराजवळील विहिरी जवळ आढळून आली. सासरच्या लोकांनी याची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली. यावेळी विहिरीत शोध घेतला असता संध्याचा मृतदेह तरंगताना आढळला. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता तिच्या डोक्याच्या मध्यभागी आणि बाजूला धारदार शस्त्राने वार केलाच्या गंभीर जखमा आढळून आल्या. तसेच हातापायावरही जखमा होत्या. त्यामुळे माहेरच्या मंडळींनी गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. 

दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील पती आणि सासरा या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर सासूचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार गेवराईत समोर आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळामुळे विवाहितेचा बळी गेल्याने न्यायाची प्रतीक्षा पीडित कुटुंब करत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com