
Solapur/Beed Crime : बीडमधील गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने (Beed Ex deputy sarpanch suicide) आत्महत्या केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नर्तकीच्या प्रेमात वेड्या झालेल्या या विवाहित माजी उपसरपंचाने स्वत:चाच जीव घेतला. नर्तकीच्या घरासमोर (सोलापूर सासुरे गाव, तालुका बार्शी) कारमध्येच उपसरपंचाने सोमवारी मध्यरात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे (34 वर्षे) असं या विवाहित माजी उपसरपंचाचे नाव आहे.
या प्रकरणात गोविंद यांचे मेहुणे जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नर्तकी पूजा देविदास गायकवाड (21 वर्षे) ही दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती, शिवाय पैशांसाठी तगादा लावत होती त्यातून गोविंद यांनी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या मेहुण्यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. यानंतर नर्तकी पूजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
काय आहे प्रकरण?
गोविंद बर्गे हे लोकनाट्य कला केंद्रात नियमित जात होते. त्यांना याची आवड होती. दीड वर्षांपूर्वी थापडीतांडा कला केंद्रामध्ये पूजा नर्तकीसोबत त्याची ओळख झाली. हळहळू यांचा प्रवास पारगाव कला केंद्राकडे वळला. गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्रीच्या संबंधाचं रुपांतर प्रेमात झालं. गोविंदने तिला पावणे दोन लाखांचा मोबाइलही नर्तकीला भेट दिला होता. याशिवाय तो तिला नियमित दागिनेही देत होता. मात्र काही दिवसांपासून पूजा माजी उपसरपंचाशी फार बोलत नव्हती. त्यामुळे गोविंद नैराश्यात होता. गोविंद तिला वारंवार फोन करीत होते. मात्र ती त्यांना काहीच प्रत्युत्तर देत नव्हती. जिच्यासाठी जीव ओवाळून टाकला ती उत्तर देत नसल्याचं गोविंद यांच्या जिव्हारी लागलं. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते. मात्र मंगळवारी कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडला.

कारमध्येच आत्महत्या
गोविंद कारच्या ड्रायव्हिंग सीटवर होते. त्यांनी उजव्या कपाळातून गोळी झाडल्याची शक्यता आहे. कार लॉक करण्यात आली होती.
कुटुंबाला धक्का...
गोविंद विवाहित होते. त्यांना नववीत शिकणारी एक मुलगी आणि सहावीत शिकणारा मुलगाही आहे. गोविंदने उचललेल्या पावलामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याने मुलांचा आणि आमचा विचार करायला हवा होता अशी भावना त्याचा मोठा भाऊ गणेश बर्गे यांनी व्यक्त केली आहे.

गेवराईचं घर नावावर करण्यासाठी तगादा?
गोविंद याच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नर्तकी पूजा गायकवाड हिने विविध कारणांमुळे गोविंदकडून पैसे लुबाडले आहेत. प्रेमसंबंध ठेवून ती गोविंदकडून पैसे, सोने लुबाडत होती. तिने दिलेल्या पैशातून मावशी आणि नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमीन घेतली. भावाच्या नावावर पाच एकर शेती करावी अशी पूजाकडून मागणी केली जात होती. याशिवाय गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर अन्यथा तुझ्याविरोधात दुष्कर्माचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी गोविंदला दिल्याचं सांगितलं जात आहे. यातून गोविंदने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world