
आकाश सावंत
जुगाराचा नाद वाईट असे म्हटले जाते. जुगार खेळू नका यासाठी जनजागृती ही केली जाते. पोलिस तर जुगारा विरोधात मोहिमा राबवतात. पण बीडमध्ये थोडं वेगळं घडलं आहे. एका पोलिसाला जुगाराचा असा काही नाद लागली की त्याने त्या सर्व काही गमावलं. कर्जबाजारी झाला. पैसे फेडायचे कसे असा प्रश्न त्याच्या समोर होता. कायद्याच्या या रक्षकानेच मग कायदा मोडण्याचा निर्णय घेतला. तो शेवटी चोर बनला. पण चोर तो चोरच. शेवटी कायद्याच्या कचाट्यात तो अडकला. त्याच्या चौकशीत त्याने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.
कायद्याच्या रक्षकानेच कायदा मोडल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. कर्जबाजारी झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक थेट चोर बनला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. "ड्रीम 11 आणि रमी ॲपसारख्या ऑनलाईन गेममध्ये तो गुंतला होता. त्याचा नाद त्याला लागला होता. त्यात त्याने मोठ्या प्रमाणात पैसे लावले होते. पण ते पैसे त्याचे बुडाले. ऑनलाईन गेम खेळण्यासाठी त्याने कर्ज घेतले होते. पण पैसे बुडाल्याने कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न त्याच्या समोर होता. त्यामुळे त्याने त्यातून चोरीचा मार्ग निवडला. विशेष म्हणजे या पोलिसाने आधीही चोरी केली होती. तो प्रकार समोर आल्यानंतर त्याला निलंबित ही करण्यात आले होते.
नक्की वाचा- Nashik News: 1 अधिकारी, 20 महिला, जिल्हा परिषदेतच लैंगिक छळ, तक्रारीत धक्कादायक खुलासे
अमित मधुकर सुतार असं या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो बीड पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता. 2024 मध्ये इन्वर्टरसाठी लागणाऱ्या दहा बॅटऱ्या त्याने चोरल्या होत्या. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. विशेष म्हणजे त्याने ही चोरी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच केली होती. या घटनेला वर्ष उलटलं नाही, तोपर्यंत सुतारने पुन्हा चोरीचा कारनामा केला आहे.
सुतार जुगारात मोठ्या प्रमाणात पैसे हरला होता. त्याने ते पैसे कर्ज म्हणून घेतले होते. ते फेडण्यासाठी त्याने परत चोरीचा मार्ग अवलंबला. त्याने दोन साथीदारांसोबत घेतलं. त्यांच्या मदतीने त्याने एक दोन नाही तर सात दुचाकींची चोरी केली. पोलिस या चोरीचा तपास करताना या पोलिसापर्यंत पोहोचली. शेवटी सुतारला अटक करण्यात आली आहे. त्यानेही दुचाकी चोरल्याचे कबुल केले आहे. बॅटरी चोरीप्रकरणी तो निलंबीत आहे. त्यानंतर तो जामिनावर सुटला आहे. पण जुगार, दारू आणि गेम्समध्ये अडकलेला हा पोलीस कर्मचारी पैशासाठी काहीही करण्यास तयार झाल्याचे समोर आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world