आकाश सावंत
हाणामारीच्या घटना या बीड जिल्ह्यातून नेहमीच येत असतात. संतोष देशमुख हत्येनंतर ही मारहाणीच्या घटना काही कमी झालेल्या नाहीत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत ऊसतोड मजदूरालाच मारहाण करण्यात आली आहे. त्याच्या पत्नी समोरच त्याला मारहाण झाली. ती मारणाऱ्यां बागायतदारांना त्यांना मारू नका अशी विनंती करत होती. पण ते तिचं काही एक ऐकत नव्हते. तरी ही त्यांनी त्या मजूराला गुराढोरा सारखं मारलं. तीला बघत राहाण्या शिवाय पर्याय नव्हता. या मारहाणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ऊसाच्या वाढ्यात कांडी का ठेवतो. तुला ऊस नीट तोडता येत नाही. असं म्हणून ऊसतोड मजुराला बागायतदाराने लाथा बुक्यांने काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. गणेश बाळासाहेब वाघ असं या ऊसतोड मजुराचं नाव आहे. विशेष म्हणजे ही मारहाण त्याच्या पत्नी समोर करण्यात आली. मारणारे चारपाच जण होते. त्यांनी गणेशला घेरले आणि शेताच्या बांधावरच त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. ऊसतोड मजुराच्या पत्नीने त्यांना मारू नका ना, त्यांना सोडा असा टाहो फोडला. मात्र तरी ही त्याला खाली पाडून मारण्यात आले.
त्या ऊसतोड मजुराच्या मानेवर पाय दिल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा वाद सुरू असताना एकाने याचा व्हिडीओ तयार केला. मारहाण करणाऱ्या पैकी एकाच्या ही बाब लक्षात आली. त्याने मोबाईल घ्या. तो फोडून टाका असं सांगत मारहाण सुरूच ठेवली. हे सर्व मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील खारेवाडी शिवारात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात गब्बू खाडे, श्रीकांत खाडे, अजय वसंत खाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी झालेल्या ऊसतोड मजुरावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडच्या धारूर तालुक्यातील खारेवाडी शिवारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ऊसतोड मजूर कुटुंब दहशतीखाली आहे. पत्नी आणि भावाला वाचवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बीडमध्ये अशा घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यांना पायबंद कधी बसणार हा खरा प्रश्न आहे. शिवाय इथं कायद्याचं राज्य आहे की नाही अशी विचारणा केली जात आहे.