- इराण युद्धामुळे उद्भवलेल्या जागतिक ऊर्जा संकटावर लोकसभेत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी भूमीका मांडली
- भारताने तेल आयातीसाठी पर्यायी मार्ग शोधून देशात तेल आणि गॅस साठा मुबलक केला आहे
- भारताने 40 देशांकडून तेल खरेदी केले आहे. त्यामुळे तेल तुटवडा भासणार नाही असं ते म्हणाले
इराण आणि इस्त्रायल युद्धामुळे उद्भवलेल्या जागतिक ऊर्जा संकटावर गुरुवारी लोकसभेत जोरदार चर्चा झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी भारताची स्थिती सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. एकेकाळी भारताची 45% तेल आयात ज्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर अवलंबून होती, तिथून मिळणाऱ्या तेलाची गरज पर्यायी मार्गांनी पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे देशात तेल किंवा गॅससाठा मुबलक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
पुरी यांनी माहिती दिली की, 2006-07 मध्ये भारत केवळ 27 देशांकडून तेल खरेदी करत होता. मात्र आता ही संख्या 40 वर पोहोचली आहे. युद्धापूर्वी 55% तेल इतर मार्गांनी येत होते. ते प्रमाण आता 70% पर्यंत वाढवण्यात आले आहे. अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, अल्जीरिया आणि रशिया यांसारख्या देशांकडून मोठ्या प्रमाणावर तेल आणि एलएनजी कार्गो भारतात येत आहेत. ज्यामुळे होर्मुज बंद होण्याचा मोठा फटका बसलेला नाही असं ही त्यांनी लोकसभेत सांगितलं.
देशातील 33 कोटी कुटुंबांच्या स्वयंपाकघरात गॅसची कमतरता भासू नये, ही सरकारची प्राथमिकता आहे. गेल्या 5 दिवसांत रिफायनरींमध्ये एलपीजी (LPG) उत्पादन 28% नी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे घरगुती गॅसच्या डिलिव्हरी सायकलमध्ये कोणताही बदल झालेला नसून, पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. देशातील वीज निर्मिती आणि उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या गॅसचा साठा पुरेसा आहे. परदेशातून एलएनजी (LNG) कार्गो दररोज भारतात पोहोचत आहेत. "युद्ध प्रदीर्घ काळ चालले तरीही भारताची अर्थव्यवस्था थंडावणार नाही, अशी व्यवस्था आम्ही केली आहे," असे पुरी यांनी स्पष्ट केले.
इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे देशात इंधन टंचाई निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. लोकसभेत राहुल गांधी यांनी यावरून सरकारला धारेवर धरले. "रेस्टॉरंट बंद होत आहेत, एलपीजीवरून भीतीचे वातावरण आहे," असे राहुल गांधी म्हणाले. सर्व सामान्य माणसाला त्याचा फटका बसत आहे. त्यात अमेरिका भारताला कुठून तेल खरेदी करायचे याचे आदेश देत आहेत. अमेरिका भारताला कुठून तेल खरेदी करायचे हे कसे सांगू शकतो असा सवाल ही त्यांनी यावेळी लोकसभेत केला. शिवाय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे नाव त्यांनी थेट एपस्टिन यांच्यासोबत जोडले. त्यानंतर सभागृहात गदारोळ झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world