
Bhiwandi Crime : भिवंडी शहरात अल्पवयीन मुलीसह तिच्या आई वडिलांना मारहाण केलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर स्थानिक जमावाने केलेल्या दगडफेकीत एक पोलीस जखमी झाला असून पोलीस वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील वऱ्हाळ देवीनगर कामतघर या झोपडपट्टी परिसरात शेजारी राहणाऱ्या दोन मुला-मुलींचे प्रेमप्रकरण असल्याचा संशय होता. यावरुन शेजारच्यांमध्ये झालेल्या भांडणात आई-वडील व अल्पवयीन मुलीला मारहाण करण्यात आली होती. यावेळी घाबरून अल्पवयीन मुलीने फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अल्पवयीन मुलीला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलीस ठाण्यास मिळताच पोलीस आयजीएम रुग्णालयात दाखल होऊन अल्पवयीन मुलीचा जाब घेत होते. त्यावेळी या गुन्ह्यातील आरोपी वऱ्हाळ देवीनगर झोपडपट्टी येथे असल्याची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार व सुनील शिंदे व तडवी हे पथक पोलीस जीप घेऊन घटनास्थळी आरोपींना पकडण्यासाठी गेले. यावेळी तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी पोलीस पथकाशी अरेरावीची भाषा करून त्या शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.
नक्की वाचा - Satara Crime : आरोपी तलवारीसह पोलीस ठाण्यात, चौकशीसाठी आलेल्या तरुणाने जीवन संपवलं; हैराण करणारं प्रकरण
पोलिसांनी त्यांना अडवण्याचा व आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता 30 ते 40 जणांच्या जमावाने पोलिसांवर व पोलrस वाहनावर दगडफेक केली. यामध्ये पोलीस शिपाई तडवी यांना दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. यावेळी जमावाने पोलीस जीपवर सुद्धा हल्ला चढवल्याने जीपचं नुकसान झाले आहे. सध्या पोलीस शिपाई तडवी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नारपोली पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आईकडून मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार यांनी सरकारी कामात अडथळा करून आरोपी पकडण्यास अटकाव करून हल्ला केल्या प्रकरणी दिलेल्या फिर्यादी वरून उमेश गायकवाड, सचिन साठे, कृष्ण मंडल, नवीन उर्फ चिंट्या, शुभम परुळेकर, उमा वाघमारे, पंकज कांबळे व इतर 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world