Pune News : एक अफवा अन् पुण्यातील पेट्रोल पंपावर मोठी कारवाई; 24 तासांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कारवाई केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News : पुण्यातील इंधन उपलब्धतेबाबत अप्रमाणित माहिती पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण केल्याप्रकरणी पुणे कॅन्टोनमेंट परिसरातील हायवे पेट्रोलियम सेंटर (पूलगेट) या पेट्रोल पंपावरील विक्री व इंधन पुरवठा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. ऑल इंडिया पेट्रोल डिझेल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांचा वानवडी येथील पुणे - सोलापूर महामार्गावर पेट्रोल पंप आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कारवाई केली आहे.

अटीचं उल्लंघन झाल्यानं कारवाई...

तेल कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित पेट्रोल पंपाकडून पेट्रोल व डिझेल तुटवड्याबाबत निराधार अफवा पसरविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाइन्स (MDG) २०२४ अंतर्गत “गंभीर अनियमितता” (Major Irregularity) म्हणून गणली जाते. डिलरशिप करारातील अटींचं उल्लंघन झाल्यानं संबंधित कारवाई करण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत तेल विपणन कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याबाबत जनजागृती केली जात असताना, अप्रमाणित माहिती प्रसारित केल्यामुळे इतर पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

नक्की वाचा - Pune News : स्वत:ला 'महादेव' म्हणत अत्याचार, ऋषिकेश वैद्य अखेर सापडला; महिलेबाबत बचाव पक्षाचा वेगळाच दावा

सदर पेट्रोल पंप चालकास २४ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास डिलरशिप रद्द करण्यासह पुढील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तेल कंपनीच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आली.

Topics mentioned in this article