सूरज कसबे, प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड परिसरात प्रेमसंबंधातून संशय बळावल्याने एका प्रियकराने मित्रांच्या मदतीने आपल्या 18 वर्षीय प्रेयसीवर चॉपरने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीररित्या जखमी झाली असून, तिच्यावर हिंजवडीमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हिंजवडी परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ तरुणी आली असता आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी तिच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी प्रियकर योगेश भालेराव ( 21 ) , त्याचा साथीदार प्रेम लक्ष्मण वाघमारे ( 20 ) , आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
नक्की वाचा - सुसाइड की अपघात? शाळेत विद्यार्थिनीचा गूढ मृत्यू, पंचनाम्यापूर्वी शाळेने रक्ताचे डागही पुसले, CCTV समोर
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मुख्य आरोपी योगेश भालेराव हा विवाहित असून त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहते. प्रेयसीचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध जुळल्याचा संशय योगेशला होता. याच संशयातून त्याने मित्रांच्या मदतीने तरुणीवर चॉपरने हल्ला केल्याचे उघड झाले आहे. या गंभीर घटनेनंतर पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे. हिंजवडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत.