
अमोल गावंडे
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले डिपॉझिट मागण्याचे प्रकरण ताजे असताना बुलढाण्यातही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मलकापुर शहरातील हकिमी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया करण्यात आली. पण रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना 40 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शिवाय मृतदेह तब्बल सहा तास अडकून ठेवल्याचा दावा ही या कुटुंबीयांनी केला आहे. ही माहिती ज्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख गजानन ठोसर,माजी नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ यांनी हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारला त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील कमलबाई यादव इंगळे या घरात पाय घसरून पडल्या होत्या. त्यांचे वय 68 वर्ष होते. त्यांचा डावा हात आणि पाय यात फ्रॅक्चर झाला. त्यांना मलकापूर येथील हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलं होतं. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून 07 एप्रिल रोजी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयात उपचार सुरू असतांना 9 एप्रिलला सकाळी 4 वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने चाळीस हजार रुपये बिल बाकी असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं. पैसे भरा आणि मृतदेह ताब्यात घ्या असं रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याचा दावा इंगळे कुटुंबियांनी केला आहे. त्यानंतर आपण रुग्णालय प्रशासनाला मृतदेह देण्याची विनंती केली. पण तरी ही काही झाले नाही. शेवटी त्यांनी शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर, माजी नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ यांना फोन मतद मागितली. शहरातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. मृतदेह अडकवून ठेवण्याचा जाब विचारत हॉस्पिटलची तोडफोड करण्याचा इशारा दिला. त्यानंतर मृतदेह उचलून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
ट्रेंडिंग बातमी - Chandrapur News: खाकीतली माणूसकी! 15 दिवसाच्या बाळाला 'तिच्या' एका कृतीने जिवनदान
याबाबत मात्र हॉस्पिटल प्रशासनाने या आरोपांचं खंडन केल आहे. सदर महिलेचे अनेक कागदपत्र जमा करणे बाकी होते. या महिलेचे शासनाकडून अप्रुव्हल घेणे बाकी असल्याने कागदी प्रक्रिया करण्यास वेळ लागल्याने मृतदेह देण्यास विलंब झाल्याचं हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे. मात्र आम्ही रुग्णाच्या नातेवाईकांना चाळीस हजार रुपये मागितले नाही. असेही रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी अनुप मालपाणी यांनी म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world