अमोल सराफ, प्रतिनिधी
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने ‘मागेल त्याला सोलारपंप' योजनेअंतर्गत अर्ज दाखल केले होते. मात्र ऑनलाईन अर्ज अपलोड न केल्याच्या कारणावरून हे अर्ज नामंजूर करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मेसेज पाहून शेतकऱ्यांना धक्का...
बुलढाण्यातील शिंदी येथील अनुसया आत्माराम खरात आणि अशोक खरात यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात वीज वितरण कंपनीकडे अर्ज सादर केले. अर्ज करताना ऑनलाईन अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी थेट कार्यालयात अर्ज जमा करत ४२ हजार ९९४ रुपये ऑनलाईन भरले. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही अर्ज नामंजूर झाल्याचा संदेश मोबाइलवर आल्यानंतर शेतकऱ्यांना धक्का बसला.
बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण
महावितरण कंपनीकडून दिवसा सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यावे लागत आहे. शासनाकडून १२ तास दिवसा वीजपुरवठ्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात परिस्थितीत बदल झालेला नाही असं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, भुईमूग यांसारखी पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. त्यातच सिंदखेडराजा तालुक्यातील काही भागांत बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण असूनही शेतकरी जीव धोक्यात घालून शेतीकाम करत आहेत. अर्ज नामंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांनी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता अर्जात त्रुटी असल्याचे सांगण्यात आले. सामायिक क्षेत्रासाठी आवश्यक सहमतीपत्र सादर करूनही केवळ ऑनलाईन अर्ज न केल्याच्या कारणावरून अर्ज नामंजूर झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपये कंपनीकडे अडकले असून पर्यायी मार्ग काढून सोलार पंप उपलब्ध करून द्यावेत किंवा भरलेली रक्कम तत्काळ परत करावी, अशी मागणी अशोक खरात यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world