पुण्यात भरधाव वेगानं पोर्शे कार चालवणाऱ्या तरुणानं दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झालाय. दोन व्यक्तींचं आयुष्य संपवण्याासाठी जबाबदार असलेल्या त्या तरुणानं मित्रांसोबत पबमध्ये बसून दारु ढोसळली होती, हे उघड झालंय. हा भयंकर अपघात होण्याच्या काही तासांपूर्वीचं CCTV फुटेज समोर आलंय, त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे.
या अल्पवयीन मुलाला 18 वर्ष पूर्ण करण्यास आणखी चार महिने बाकी आहेत. बारावीच्या निकालाचा आनंद साजरा करण्यासाठी तो बारमधील एका गोलाकार टेबलवर मित्रांसोबत बसून दारु पित असल्याचं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्याच्या टेबलवर वेगवेगळ्या अल्कोहलच्या बाटल्या दिसत होत्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय. मुळचे मध्य प्रदेशमधील असलेले हे दोघं पुण्यात कामासाठी स्थायिक झाले होते. शनिवारी रात्री 2 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे बेदरकार पद्धतीनं ही पोर्शे कार चालवणाऱ्या या तरुणाला फक्त 15 तासांमध्ये जामीन मंजूर झाला.
पोलिसांनी या तरुणावर निष्काळजीपणे गाडी चालवणे, जीव आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणल्याच्या आरोपाखाली भारतीय दंड संहिता तसंच महाराष्ट्र मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : शाळकरी मुलांनी रिल्ससाठी चोरल्या महागड्या कार, एका चुकीमुळं फुटलं बिंग )
हा अतिशय घृणास्पद अपराध असल्यानं कोर्टानं या अल्पवयीन तरुणाला प्रौढ म्हणून वागणूक द्यावी अशी मागणी पोलीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलीय. तो अल्पवयीन तरुण दारुच्या प्रभावाखाली कार चालवत होता, हे आता सिद्ध झालंय. अनेक प्रत्यक्षदर्शींनी तो तरुण आणि त्याच्या मित्रांनी भरपूर मद्यप्राशन केलं होतं, असं सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.
या प्रकरणात सध्या अल्पवयीन तरुणाचे वडिल आणि त्याला अल्कोहल पुरवणाऱ्या बारच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.