अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर: नागपूरमध्ये अवघ्या 24 वर्षाच्या तरुणाने आई आणि वडिलांची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला. ही घटना ताजी असतानाच आता गाडीला कट लागल्याच्या वादातून अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये घडला आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चंद्रपूर शहराच्या गौतमनगर भागात चार अल्पवयीन मुलांनी रात्रीच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाची हत्या केली. अंचलेश्वर परिसरात दुचाकीने जाताना दुचाकीचा कट लागून वाहनाचे नुकसान झाल्याचे कारण पुढे आले आहे. कट लागल्यावर तन्मय शेख या युवकाचा पाठलाग करत चौघांनी आधी त्याला धाक दाखवून नुकसान भरपाई मागितली.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मयताने यासाठी घराकडे सोबत यावे असे सांगत सर्वांना गौतमनगर परिसरात आणले. मात्र वाद वाढल्यानंतर चौघांनी मारहाण करत तन्मय शेख याची हत्या करत मृतदेह झुडुपात फेकला. नुकसान भरपाई संदर्भात बातचीत करताना मयताने आपल्या भावाला घटनेची माहिती दिली होती. मोबाईल ट्रेस न झाल्याने भावाने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस तपास सुरू झाला.
तपासादरम्यान चार अल्पवयीन आरोपींची नावे पुढे आली आहेत. घटनेत क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाचा जीव गेल्याने परिसर हादरला आहे. यात एक आरोपी तर चक्क पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा देखील आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.
दरम्यान, चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या एका महिलेस चौघांच्या टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या चौघांकडून पाच लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विटा-कडेपूर मार्गावर सापळा रचून तिघा तरुणांना सोन्याच्या दागिन्यासह अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह पाच लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे.