Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी वाळूज परिसरातील विटावा शिवारात आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या खुनाचा थरारक उलगडा करण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना मोठं यश आलं आहे. अवघ्या ५०० रुपयांच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याचं तपासात समोर आलं असून आरोपींनी खून केल्यानंतर इन्स्टाग्रामवर टाकलेल्या “टपका रे टपका” रिलमुळेच पोलिसांना महत्त्वाचा सुगावा लागला.
या प्रकरणी ओंकार चंद्रकांत सूर्यवंशी (वय २२, रा. रामनगर सागवी, नांदेड) असं मृत तरुणाचं नाव असून रवी देविदास दुधमल (वय १९, रा. नांदेड), सय्यद हाशिम सय्यद हसन (वय १८, रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर) यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मृत आणि आरोपी हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. १४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विटावा शिवार परिसरात ही घटना घडली होती. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र १८ मे रोजी संशय अधिक गडद झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचं स्पष्ट झाले.
इन्स्टाग्रामवरील रीलमुळे मोठा खुलासा....
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील विविध CCTV फुटेज तपासले. त्यामध्ये संशयित दुचाकी दिसून आल्याने पोलिसांनी वाहनाचा माग काढत तपासाची सूत्रे फिरवली. त्याचवेळी आरोपींनी खूनानंतर इन्स्टाग्रामवर “टपका रे टपका” गाण्यावर रिल आणि स्टोरी पोस्ट केल्याचं समोर आलं. सायबर पोलिसांनी सोशल मीडिया अकाउंटची माहिती गोळा करत आरोपींची ओळख निश्चित केली. दरम्यान आरोपी नांदेड परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांचे विशेष पथक तेथे दाखल झाले. सलग तीन ते चार दिवस पोलिसांनी गुप्तता ठेवली. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी भाजी विक्रेत्यांचा वेश धारण करून आरोपींबाबत माहिती मिळवली. तपासात एक आरोपी जेलमधून पसार होऊन संभाजीनगरमध्ये आल्याचंही समोर आलं.
यानंतर आरोपी परराज्यात फरार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथेही शोधमोहीम राबवली. आरोपी पुन्हा परिसरात परतताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान आरोपींनी ५०० रुपयांच्या किरकोळ वादातून धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गंभीर आणि किचकट गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास केला. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.