संजय तिवारी, प्रतिनिधी
साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला बालविवाहाची भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही ठिकाणी बालविवाहाची कुप्रथा राबवली जाते. बालविवाह रोखण्यासाठी भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. तसेच बालविवाह होताना आढळल्यास 1098 वर संपर्क करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
आज अक्षय्य तृतीया आहे. या शुभ मुहूर्तावर सामुदायिक आणि एकल विवाह समारंभ मोठ्या संख्येने आयोजित केले जातात. मात्र अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बाल विवाहाची कुप्रथा देखील राज्यात काही ठिकाणी केली जाते. सामूहिक विवाह समारंभातही बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भंडारा जिल्हा बालविवाह मुक्त व्हावा याकरिता शासन स्तरावरून बालविवाह प्रतिबंध आदेश जिल्हयात लागू करण्यात आले आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर आयोजित विवाह समारंभ सोहळ्यात बालविवाह होण्यास प्रतिबंध करण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांनी कडक निर्देश जारी करण्यात आले आहेत. बाल विवाहास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत करणारे सर्व कडक कायदेशीर कारवाईस पात्र ठरणार आहेत.
नक्की वाचा - पतीशी वाद, पत्नीचं टोकाचं पाऊल, 2 चिमुकल्यांबरोबरही भयंकर केलं
भंडारा जिल्हयातील लग्नपत्रिका छपाई करणारे प्रेसचालक, मंडप डेकोरेशन चालक फोटोग्राफर, आचारी, मंगल कार्यालय लॉन सभागृह व्यवस्थापक, बँडवादक, कॅटरिंग चालक, विविध जाती धर्मातील विवाह लावण्यात येणारी व्यक्ती या सर्वांना विवाहाचे काम घेताना मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्याची खातरजमा करूनच विवाह समारंभाची बुकिंग किंवा सेवेचे कंत्राट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील तरतुदीनुसार जो कोणी बालविवाह विधीपूर्वक लावण्यासाठी चालना किंवा परवानगी देईल किंवा विधीपूर्वक लावण्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जीपणाने कसूर करेल, यामध्ये बाल विवाहास उपस्थित राहणारी किंवा त्यात सहभागी होणारी व्यक्ती यांचाही समावेश होतो.
अशांना दोन वर्षांपर्यंत सश्रम कारावासाच्या शिक्षेस आणि एक लाख रूपयांपर्यंत इतक्या दंडाच्या शिक्षेस देखील पात्र होईल. बाल विवाह संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा महिला व बाल विकास विभागाच्या चाईल्ड हेल्प लाईन 1098 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान शासनाकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world