इंस्टाग्रामवर लाईव्ह करत एका तरुणाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना कोल्हापुरातील पंचगंगा नदी परिसरात घडली. किरकोळ कारणावरून केलेल्या या आत्महत्येनंतर नातेवाईकांना धक्का बसला. दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर अखेर या तरुणाचा मृतदेह सापडलेला आहे. त्याच्या मित्रांनाही या आत्महत्येनंतर धक्का बसला आहे. शिवाय त्यांनी जे काही घडलं ते लाईव्ह पाहीलं. त्यावेळी इच्छा असुनही ते आपल्या मित्राला वाचवू शकले नाहीत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हर्षवर्धन विजय सुतार हा तरुण 22 वर्षाचा होता. मुळ करवीर तालुक्यातल्या वरणगे पाडळी या गावचा राहाणारा होता. सध्या तो कोल्हापुरातील राजोपाध्येनगर येथे राहत होता. घरी झालेल्या किरकोळ वादातून त्यानं हे टोकाचे पाऊल उचललं आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत त्याने उडी घेतली. या मार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणावर असल्याने घटनास्थळावरील काहींनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती.
पोलिसांना कळवल्यानंतर करवीर, लक्ष्मीपुरी पोलीस आणि महानगरपालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले होते. नदीत उडी घेतलेल्या हर्षवर्धनची शोध मोहीम सुरू करण्यात आली. शनिवारी सायंकाळपर्यंत हर्षवर्धनचा काही एक पत्ता लागला नाही. त्यामुळे पुन्हा रविवारी सकाळी ही शोधमोहिम सुरु करण्यात आली. दुपारच्या सुमारास अखेर हर्षवर्धनचा मृतदेह शोध पथकाला सापडला.
हर्षवर्धन हा कोल्हापुरातील त्याच्या मामाकडे राहत होता. तो एका महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी कोल्हापुरात वास्तव्यास होता. शनिवारी दुपारी दुचाकी घेऊन तो शिवाजी पुलावर आला. शिवाजी पुलाच्या कोल्हापूर दिशेने येणाऱ्या मार्गावर त्याने दुचाकी थांबवली. त्यानंतर पुलाच्या कठड्याजवळ जाऊन थांबला. त्याने त्याच्या मोबाईलमधून इंस्टाग्रामवर मित्रांना फोन करून लाईव्ह येण्यास सांगितलं.
सर्व जण लाईव्ह आल्यानंतर त्याने मी आत्महत्या करत असल्याची माहिती मित्रांना दिली. इतकच नाही तर तुम्ही सर्वजण आनंदी राहा, मजेत राहा असाच शेवटचा संदेशही सर्वांपर्यंत पोहोचवला. या दरम्यानच थेट त्यांने पंचगंगेत उडी घेतली. हर्षवर्धन उडी घेतल्यानंतर आजूबाजूला असणाऱ्या काहींनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र त्याला वाचवण्यात कोणालाही यश आलं नाही. हर्षवर्धन सुतार या तरुणाने ही टोकाची भूमिका का घेतली याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र घरी आजी आणि इतर नातेवाईकांसोबत झालेल्या किरकोळ वादातून त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world