राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
Pune Crime : पुण्यात महिलांच्या सुरक्षेसह गाड्यांची होणारी तोडफोड ही मोठी समस्या उभी राहिली आहे. रात्रीच्या वेळी काही उपद्रवी तरुण पार्किंगमधील आणि रस्त्यांवर उभ्या असलेल्या दुचाकी-चारचाकी गाड्यांची तोडफोड करीत असल्याच्या अनेक घटना पुण्यातून समोर आल्या आहेत. त्यामुळे आपली गाडी घराबाहेर पार्क करताना नागरिकांना धाकधूक असते. याबाबत पुणे प्रशासनाकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षभरात गेल्या दोन महिन्यात नऊ ठिकाणी वाहनांची तोडफोड झाली. त्यात नागरिकांच्या शेकडो दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचं नुकसान झालं आहे. हडपसर, येरवडा, कोंढवा, वानवडी आणि सहकारनगर हे भाग 'हॉटस्पॉट' ठरले आहेत. या भागांत सर्वाधिक वाहनांची तोडफोड झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांना आता 'एमपीडीए' कायद्यान्वये एका वर्षासाठी थेट कारागृहात स्थानबद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. पूर्ववैमनस्यातून, आपसांतील किरकोळ वादातून, सराईत गुन्हेगारांकडून त्यांच्या भागात दहशत निर्माण करण्यासाठी, तर कधी प्रेमप्रकरणातूनही वाहनांची तोडफोड झाल्याचे समोर आलं आहे.
नक्की वाचा - Road Accident : रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
हडपसर, येरवडा, कोंढवा, वानवडी, सहकारनगर, पर्वती, लोणी काळभोर, बिबवेवाडी, वारजे माळवाडी, सिंहगड रस्ता, विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहन तोडफोडीच्या घटनांचे प्रमाण तीन आणि तीनेपक्षा अधिक आहे. स्वारगेट, खडकी, चंदननगर, लोणीकंद पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी दोन घटना घडल्या आहेत. तसेच समर्थ, डेक्कन, शिवाजीनगर, विश्रामबाग, लष्कर, कोरेगाव पार्क, आंबेगाव, कोथरूड, उत्तमनगर, नांदेड सिटी, बाणेर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एका घटनेची नोंद झाली आहे.