जाहिरात

Road Accident : रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

राज्यात रस्ते अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक घटनांमध्ये केवळ चालकाच्या दारू प्यायल्याने नागरिकांचा हकनाक बळी गेला आहे.

Road Accident : रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

Road Accident : राज्यात रस्ते अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये दारू पिऊन गाडी चालविण्याची संख्या अधिक आहे. अनेक घटनांमुळे केवळ चालकाच्या चुकीमुळे नागरिकांचा हकनाक बळी गेला. आता तर दारूबरोबरच ड्रग्सचं सेवन करून चारचाकी चालवित असल्याचं लक्षात आल्यानंतर राज्य सरकार अलर्टवर आहे. यासाठी परिवहन विभागाकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांमार्फत नियमितपणे वाहन चालकांची अल्कोहोल सेवन तपासणी करण्यात येते. मात्र यापुढे आता 'अल्कोहोल' सोबत ड्रग्स सेवनाची तपासणीही करण्यात येणार आहे. ड्रग्स सेवन तपासणीच्या मशीन लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. राज्यात होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणाबाबत सदस्य काशिनाथ दाते यांनी प्रश्न उपस्थित केला होता.  

या प्रश्नाच्या उत्तरात परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, देशभरात रस्ते अपघातांमध्ये वाढ होत आहे. त्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. मात्र राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण .02 टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अपघाती मृत्यूच्या प्रमाणातही मागील वर्षाच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून येते. शासनाने जिल्हा नियोजन समितीचा एक टक्का निधी रस्ता सुरक्षेसाठी राखीव ठेवला आहे. या निधीच्या माध्यमातून रस्ता सुरक्षाविषयक विविध उपाययोजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Pune Traffic : AI द्वारे सुटणार पुण्याच्या वाहतुकीची समस्या, सरकारचा प्लॅन काय?

नक्की वाचा - Pune Traffic : AI द्वारे सुटणार पुण्याच्या वाहतुकीची समस्या, सरकारचा प्लॅन काय?

वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत आहे. त्यासाठी विभागाने 263 इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली आहे. चालक परवान्यांमध्ये अधिक कडक नियमावली अमलात आणण्यात येत आहे. राज्यात 38 ठिकाणी ऑटोमॅटिक ड्राइविंग टेस्ट सुरू करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 70 टक्के परवानाधारक अपात्र ठरले आहेत. यापुढे चालक परवान्यांमध्ये अचूकता येण्यासाठी ऑटोमॅटिक टेस्ट ट्रॅकचा उपयोग करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी दंड करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचाही उपयोग करण्यात येईल.