सायबर भामट्यांनी सध्या सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. त्यांना भलेभले बळी पडत आहेत. त्यांची गुन्हा करण्याची पद्धतच अशी आहे की समोरचा माणूस पुर्णपणे त्यांच्या समोर हतबल होतो. शेवटी कोट्यवधी आणि लाखो रुपयांना लुटला जातो. आपण लुटलो गेलो आहोत हे ज्यावेळी समजतं त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. असाच एक धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये घडला आहे. इथं असलेल्या एका डॉक्टर महिलेला सायबर भामट्यांनी लाखो रुपयांना चुना लावला आहे. त्यांना एक फोन कॉल आला आणी बघता बघता त्यांच्या खात्यातून लाखो रुपये फुर्रर्रर्र झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रणोती रूपेश जडगे या कराडच्या रहिवाशी आहेत. त्या पेशाने डॉक्टर आहेत. त्यांचा याच ठिकाणी दवाखानाही आहे. त्यांना एक फोन आला. समोरून बोलणारा व्यक्ती म्हणाला, हॅलो मी कस्टम डिपार्टमेंट मधून बोलतोय. तुमचे एक पार्सल दिल्ली विमानतळावर पकडले गेले आहे. त्यात तुमच्या नावाचे पासपोर्ट, ड्रग्ज आणि एटीएम कार्ड सापडले आहेत. डॉक्टर प्रणोती जडगे यांना अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. संबंधिताने आपण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंट्रोल रूममधून सीमाशुल्क अधिकारी सुमित मिश्रा बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने दिल्ली ते मलेशियासाठीचे पार्सल विमानतळावर अडवून ठेवले आहे. त्यामध्ये 16 पासपोर्ट, 58 एटीएम कार्ड आणि 140 ग्रॅम ड्रग्ज आहेत. तुमच्या नावाचे सर्व डिटेल्स त्या पार्सलमध्ये आहेत असंही सांगण्यात आलं.
याबाबतचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्या पोलिस ठाण्याला गुन्हा नोंदवला, त्या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी बोला, असे त्या मिश्रा नावाच्या व्यक्तीने सांगितले. तसेच त्याने वसंतकुंज पोलिस ठाण्यातील सुनील कुमार या व्यक्तीशी फोन जोडून दिला. सुनील कुमार याने डॉ. जडगे यांना गुन्हा दाखल होण्याची भीती घातली. न्यायालयाने तुमची सर्व बँक खाती गोठविण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगितले. तसेच दिल्ली न्यायालयाच्या नावे असलेल्या आदेशाची एक प्रत डॉ. प्रणोती जडगे यांच्या व्हॉट्सअॅपला पाठवून दिली. या सर्व प्रकारामुळे डॉ.जडगे घाबरल्या. त्यानंतर सुनील कुमार नामक व्यक्तीने त्यांना व्हिडिओ कॉल करून तुम्हाला यातून निर्दोष बाहेर पडायचे असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम रिझर्व बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करा असे सांगितले.
डॉक्टर जडगे यांनी त्यांच्या बँक खात्यातील 16 लाख 25 हजार 100 रुपये संशयितांनी दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाईन हस्तांतरित केले. रिझर्व बँकेकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम तुमच्या खात्यात पुन्हा जमा होईल असे सुनील कुमार यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर सुनील कुमार व सुमित मिश्रा या दोघांचेही फोन लागले नाहीत. तसेच त्यांच्याशी कसलाही संपर्क झाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर डॉक्टर प्रणोती जडगे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार सुभाष फडतरे तपास करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world