
बदलापुरात चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी बदलापूरकरांनी उत्स्फूर्त आंदोलन केलं होतं. त्यानंतर या आंदोलकांवर सरकारने गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी विनंती आंदोलकांनी राज्य सरकारला केली आहे. नराधम अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करून आम्हाला न्याय दिला आहे, त्यामुळे आता आमच्यावरील गुन्हे सुद्धा मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जे आंदोलन झाले ती एक प्रतिक्रीया होती असं आंदोलकांनी म्हटलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चिमुरड्यांवर अत्याचार झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटले. बदलापूर रेल्वे स्थानकात जनता आक्रमक झाली होती. त्यात सर्वच बदलापूरकर सहभागी झाले होते. याच आंदोलकांवर पुढे गुन्हे ही दाखल करण्यात आले. आता या आंदोलकांनी बदलापुरातील वकील आणि पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर पीडित मुलीचे वकील प्रियेश जाधव यांच्यासह अन्य वकिलांनी एकही रुपया न घेता सर्व आंदोलकांची बाजू न्यायालयात मांडली.
त्यांनी योग्य प्रकारे बाजू मांडल्यानंतर आंदोलकांना जामीन मिळाला होता. तर पत्रकारांनी ही सुरुवातीपासून या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून वार्तांकन केलं होतं. याबद्दल वकील आणि पत्रकारांचे आंदोलकांनी आभार मानले. तसेच यावेळी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर मुळे आम्हाला न्याय मिळाला असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. आता आमच्यावरील आंदोलनाचे गुन्हे सुद्धा सरकारने मागे घ्यावेत, अशी विनंती या आंदोलकांनी राज्य सरकारला केली आहे.
या आंदोलनानंतर संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा झाली. आंदोलनावर टिकाही झाली. राजकारणही झाले. सत्ताधारी विरोधक एकमेकांना भिडले होते. आता या प्रकरणातील मुख्य आरोपीचा खात्मा झाला आहे. त्यामुळे ज्या गोष्टीसाठी आंदोलन उभे राहीले ती पूर्ण झाली आहे. त्यामुळेच आता आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेतले जावेत अशी मागणी होत आहे. नाही तर वर्षोनी वर्षे या सर्वांना कोर्टाचे खेटे मारावे लागतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world