- उमरगा तालुक्यातील बेरडवाडी भुसणी येथे पतीने पत्नी व आठ वर्षाच्या मुलीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला
- आरोपी अजित अपन्ना वासुदेवने मध्यरात्री मुरूम पोलीस ठाण्यात हजर होऊन स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे
- आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे या खुनाची प्राथमिक कारणे पोलीस तपासात समोर आली आहेत
ओंकार कुलकर्णी
उमरगा तालुक्यातील बेरडवाडी भुसणी इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी बापानं आपल्या आठ वर्षाच्या पोटच्या लेकीसह पत्नीचा ही खून केला. कुऱ्हाडीचे घाव घालत त्यांनी ही हत्या केली. पत्नीच्या चारित्र्यावर तो संशय घेत होता. त्यातून त्याने पत्नीचा खून केला. खून करताना चिमुकल्या मुलीने ते पाहीले. त्यामुळे त्याने कसला ही मागचा पुढचा विचार न करता लेकीला ही संपवलं. यावेळी मुलगा ही घरी होता. त्याला ही संपवण्याचा बापाचा प्लॅन होता. पण तो तिथून पळाला आणि थोडक्यात बचावला. या घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली आहे.
ही घटना मंगळवार 7 एप्रिलाल घडली. मध्यरात्रीच्या सुमारास त्याने दोघींचा ही खून केला. खून केल्यानंतर आरोपी स्वतः मुरूम पोलिसात हजर झाला. शिवाय आपण आपल्या पत्नीचा आणि मुलीचा खून केला असल्याचं त्याने पोलीसांना सांगितलं. पोलीस ही त्याच्या या वक्तव्याने गोंधळून गेले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आई व चिमुकल्या मुलीच्या खुनाने हळहळ व्यक्त होत आहे. पतीने पत्नीसोबत आणि मुली सोबत असं का केले याची चर्चा आता रंगली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अजित अपन्ना वासुदेव हा मंगळवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास मुरूम पोलीस ठाण्यात हजर झाला. आपण कुऱ्हाडीने घाव घालून पत्नी लिंबूबाई व मुलगी मानसी या दोघींचा खून केल्याचे त्याने पोलीसांना सांगितले. यावरून मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीपान दहिफळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. शिवाय शवविच्छेदनासाठी मुरूम ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी मुरूम पोलीस ठाण्यात भेट देत तपासासाठी मार्गदर्शन केले. याबाबत नागनाथ शेंमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अजित अपन्ना वासुदेव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय पुढील तपास मुरूम पोलीस करत आहेत. आरोपी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world