नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule News : आनंदाचे वातावरण असलेल्या धुळ्यातील एका घरात अवघ्या काही तासांतच अत्यंत भीषण आणि थरारक घटना घडली आहे. बहिणीच्या लग्नाचा सोहळा आनंदात पार पाडून घरी परतलेल्या आई-वडिलांना काही कळायाच्या आतच त्यांच्यावर काळानं घाला घातला. विशेष म्हणजे, हा काळ दुसरा कोणी नसून त्यांचा स्वतःचा पोटचा मुलगाच होता. पत्नीसमोर आई-वडिलांनी आपल्याला अपमानास्पद शब्द वापरले, याच एका गोष्टीचा टोकाचा राग मनात धरून या मुलानं जे पाऊल उचललं, त्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकाच वेळी खळबळ आणि हळहळ व्यक्त होत आहे.
काय आहे प्रकरण?
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील महावीर सोसायटीमध्ये आज दुपारच्या सुमारास (15 मे 2026) ही अत्यंत धक्कादायक घटना घडली. इंदाराम महतो आणि त्यांची पत्नी रांजुदेवी महतो हे आपल्या मुलीचे लग्न आटोपून आजच अत्यंत आनंदाने घरी परतले होते. घरात लग्नाची लगबग आणि उत्साह अजूनही कायम होता. मात्र, घरगुती कारणावरून त्यांचा मुलगा चंदन इंदाराम महतो याच्यासोबत काही कारणाने वाद झाला.
( नक्की वाचा : Dombivli News : डोंबिवलीत घरांच्या नावाखाली कोट्यवधींची लूट; संरक्षण खात्याच्या जमिनीवर बांधल्या चाळी, शेकडो.. )
बायकोसमोर अपमान केल्याचा राग
या वादादरम्यान आई-वडिलांनी चंदन याला त्याच्या पत्नीसमोर काहीतरी अपमानास्पद शब्द वापरले. आपल्या पत्नीसमोर आई-वडिलांनी आपला अपमान केला, ही गोष्ट चंदनच्या जिव्हारी लागली आणि त्याचा रागाचा पारा अनावर झाला. याच रागाच्या भरात त्याने घरात असलेले मुसळ उचलले आणि थेट आपल्या जन्मदात्या आई आणि वडिलांच्या डोक्यात एकापाठोपाठ एक सपासप प्रहार केले.
( नक्की वाचा : Dombivli News: नवऱ्यानं आधी घरातील सिलेंडर लांबवला, आता पत्नीला सांगतोय ‘धंदा कर'; डोंबिवलीतील संतापजनक प्रकार )
हा हल्ला इतका भीषण होता की, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे रांजुदेवी महतो आणि इंदाराम महतो या दोघांचाही जागीच रक्ताच्या थारोळ्यात दुर्दैवी मृत्यू झाला.
शेजाऱ्यांनी पकडले
स्वत:च्याच आई-वडिलांचा जीव घेतल्यानंतर आरोपी मुलगा चंदन महतो हा घटनास्थळावरून तातडीने पळून जाण्याच्या तयारीत होता. घरातून घाईघाईने बाहेर पडणाऱ्या चंदनला पाहून शेजारील नागरिकांना संशय आला. त्यांनी तातडीने प्रसंगावधान राखत त्याला जागीच पकडून ठेवले आणि घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. नागरिकांनी पकडल्यामुळे आरोपीला तिथून पळून जाण्यात यश आले नाही.
चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही
माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तातडीने महावीर सोसायटीमध्ये धाव घेतली आणि आरोपी चंदन महतो याला आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पोटच्या मुलाने आपल्या आई-वडिलांची इतक्या निर्घृणपणे हत्या केली, त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप किंवा दुःख दिसून येत नव्हते. पोलिसांनी या दुहेरी हत्याकांड प्रकरणाची नोंद केली असून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world