नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule News: न्यायालयात सकारात्मक अहवाल सादर करण्यासाठी तब्बल 40 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट ठाण्यातच धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत एका पोलीस उपनिरीक्षकासह एका पोलीस शिपायाला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. गृहकर्ज फसवणुकीच्या एका प्रकरणात न्यायालयाला अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
धुळे तालुक्यातील वलवाडी येथील एका घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून एका दाम्पत्याने 2015 मध्ये एका वित्त कंपनीकडून तब्बल 36 लाख 10 हजार रुपयांचे गृहकर्ज परस्पर उकळले होते. ज्यांच्या नावावर घर होते, त्यांच्या जावयाने म्हणजेच तक्रारदाराने या फसवणुकीविरोधात धुळे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालयात सकारात्मक अहवाल पाठवणे आवश्यक होते.
( नक्की वाचा : Nagpur News : देवाला हात जोडला, प्रदक्षिणा मारली अन्...नागपुरात 65 वर्षांच्या चोराचा मंदिरात भलताच कारनामा )
किती मागितली होती लाच?
हा सकारात्मक अहवाल न्यायालयात पाठवण्यासाठी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांनी सुरुवातीला 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवली.
एसीबीने पंचांच्या समक्ष या तक्रारीची खात्रीशीर पडताळणी केली. त्यावेळी तडजोड होऊन लाचेची रक्कम 40 हजार रुपये ठरली.
( नक्की वाचा : Nagpur News: काही मिनिटांत डिलिव्हरीच्या शर्यतीतून रक्तरंजित खेळ! नागपुरात रस्ता अडवून सहकाऱ्यावर चाकूने सपासप वार )
पोलीस ठाण्यातच रचला सापळा
लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरल्यानंतर एसीबीच्या पथकाने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातच सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस शिपाई अविनाश सादरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात सहभागी असलेले पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांनाही तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
या दोन्ही लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या थेट कारवाईमुळे लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world