
जैनांची काशी म्हणून मान्यता असलेल्या शिरपुर येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरात श्वेतांबर व दिगंबर या दोन पंथियांमध्ये 11 मे रोजी दुपारी 1 वाजे दरम्यान हाणामारी झाली होती. या प्रकरणात परस्पर विरोधातील तक्रारीवरुन 16 जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत शिरपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरामध्ये श्वेतांबर पंथाच्या पूजेच्या वेळी श्वेतांबर पंथाचे पुजारी क्षेत्रपाल महाराज यांच्या मूर्तीची शेंदूर, फुले, हार आणि चांदीचा वर्क लावून पूजा केल्याच्या कारणावरून दोन्ही पंथीयांचे पुजारी व मंदिरामध्ये कामावर असलेली व्यक्ती यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली व त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झालं असल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये महेश जैन दिगंबर पुजारी व प्रियंक प्रकाशभाई सेठ श्वेतांबर पथ स्वयंसेवक हे दोघे जखमी झाले आहेत. यातील महेश जैन गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने त्यांना वाशीम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रियंक प्रकाशभाई सेठ याच्या फिर्यादीवरून महेश जैन पुजारी, हर्षल संजय विश्वंभर, तात्या भैया व रवी पद्मकुमार महाजन व इतर सात ते आठ जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 114, 323, 504, 506 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिगंबर पंथाकडून दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले. श्वेतांबर पुजारी दिगंबर पंथीयांच्या विरुद्ध पूजन पद्धती करीत असल्याचे दिसून आल्याने पूजेचे साहित्य हटविण्यात आल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना शिक्षा कधी? न्यायालयाच्या निकालाला चॅलेंज करणार
या कारणावरून विनायकराव बालासाहेब देशमुख, संदीप भांदुर्गे, सुरज देशमुख, महादेव भालेराव, गोपाल भालेराव, संदीप जाधव, निर्भया कोठारी, प्रियांश शहा, कौशल्य, पंकज भराडीया, ज्ञानेश्वर देशमुख यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील संदीप भांदुर्गे याने लाकडी काठीने फिर्यादीच्या डोक्यावर मारून त्याला जखमी केले.अशा महेश शिखरचंद जैन यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध विविध कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पो.नि.रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात एपीआय महेश कुचेकर करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world