
Dombivli Blackmail Case : डोंबिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आरोपीने मुलीचा अर्धनग्न व्हिडिओ मिळवून तो तिच्या वडिलांना पाठवला आणि पैशांसाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चिराग गवांडे याचा शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील मिळालेल्या माहितीवरुन पीडित मुलगी 11 वीत शिकते. तिचे वडील कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत राहतात. मुलीशी सहज संपर्क साधता यावा म्हणून त्यांनी तिला एक चांगला मोबाईल घेऊन दिला होता. याच मोबाईलवर मुलीने एक चॅटिंग ॲप डाऊनलोड केले. तिच्या आईने ते ॲप डिलीट करायला सांगितले असले तरी, तिने ते केले नाही. याच दरम्यान इंस्टाग्रामवर तिची चिराग गवांडे नावाच्या तरुणाशी मैत्री झाली.
मैत्री झाल्यानंतर चिरागने मुलीकडून तिचा इंस्टाग्राम आयडी आणि पासवर्ड घेतला. काही दिवसांनी त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. "माझ्याकडे तुझे काही फोटो आहेत आणि तुझा पासवर्डही आहे. जर तू मला अर्धनग्न व्हिडिओ पाठवला नाहीस, तर मी तुझे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करून तुझी बदनामी करेन," अशी धमकी त्याने दिली. घाबरलेल्या मुलीने त्याला व्हिडिओ पाठवले.
( नक्की वाचा : Titwala : इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली जीवघेणी; टिटवाळ्याच्या तरुणीनं व्हिडिओ कॉल करत संपवलं आयुष्य )
वडिलांकडून पैशांची मागणी
चिरागने मुलीकडून मिळवलेले अश्लील व्हिडिओ तिच्या वडिलांना इंस्टाग्रामवर पाठवले. त्यानंतर त्याने त्यांना फोन करून "तुमच्या मुलीचे अर्धनग्न व्हिडिओ माझ्याकडे आहेत. आता आपण बिझनेसबाबत बोलूया," असे म्हणत पैशांची मागणी केली. या प्रकाराने भयभीत झालेल्या कुटुंबीयांनी तात्काळ मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी चिराग गवांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मानपाडा पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे मुलीचे कुटुंब आणि सोसायटीतील रहिवासी भयभीत झाले आहेत. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world