जाहिरात

Dombivli News: बाऊन्सरच्या गराड्यातला डोंबिवलीचा भामटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात! कसं उलगडलं फसवणुकीचं रॅकेट?

Dombivli News: लोकांवर प्रभाव पाडून त्यांना कर्जाचे आमिष दाखवायचे आणि नंतर फसवणूक करायची, अशी त्याची पद्धत होती, असं उघड झालं आहे. 

Dombivli News: बाऊन्सरच्या गराड्यातला डोंबिवलीचा भामटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात! कसं उलगडलं फसवणुकीचं रॅकेट?
Dombivli News: निखिल भोईर हा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना जाळ्यात ओढत असे.
डोंबिवली:

Dombivli News: डोंबिवलीमध्ये स्वतःचा मोठा वचक असल्याचे भासवून नामांकित बिल्डर, वकील आणि चक्क निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका भामट्याचा पर्दाफाश झाला आहे. बाउन्सरची फौज आणि सोबत गनमॅन घेऊन फिरणाऱ्या निखिल भोईर याला विष्णुनगर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. लोकांवर प्रभाव पाडून त्यांना कर्जाचे आमिष दाखवायचे आणि नंतर फसवणूक करायची, अशी त्याची पद्धत होती, असं उघड झालं आहे. 

काय आहे प्रकरण?

या प्रकरणातील तक्रारदार एका प्रसिद्ध बिल्डरला 15 कोटी रुपयांच्या कर्जाची तातडीने गरज होती. निखिल भोईर हा कर्ज मिळवून देतो, अशी माहिती एका मित्राकडून मिळाल्यानंतर बिल्डरने त्याच्याशी संपर्क साधला. निखिलने कर्ज मिळवून देण्याचे कबूल केले, पण त्यासाठी सव्वा टक्के कमिशन आधी द्यावे लागेल, अशी अट घातली. 

गरजेपोटी बिल्डरने त्याला कमिशनची रक्कम आगाऊ दिली. त्यानंतर निखिलने या बिल्डरला 5 कोटी रुपयांचा चेक दिला, मात्र तो चेक बँकेत वटलाच नाही. पैसेही मिळाले नाहीत आणि दिलेले कमिशनही बुडाले, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे बिल्डरच्या लक्षात आले.

( नक्की वाचा : Kalyan News : भरदिवसा हल्ला अन् 2 महिने फरार; कल्याणमधील 'त्या' दहशतीचा अंत? बड्या आरोपींची चौकशी सुरू )

बाउन्सर आणि गनमॅनचा वापर करून लोकांवर प्रभाव

निखिल भोईर हा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना जाळ्यात ओढत असे. आपण किती मोठे आहोत हे दाखवण्यासाठी तो नेहमी स्वतःच्या मागे बाउन्सरची मोठी टीम आणि एक गनमॅन घेऊन फिरत असे. त्याच्या या लवाजम्याला पाहून मोठ्या पदरावरील व्यक्तींचाही त्याच्यावर सहज विश्वास बसत असे. कोणाला कितीही कर्ज पाहिजे असेल, तर मी ते मिळवून देऊ शकतो, असे तो ठामपणे सांगत असे. याच थाटात त्याने नामांकित वकील आणि सेवानिवृत्त एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही फसवणूक केली आहे.

Latest and Breaking News on NDTV

बिल्डरने दिलेल्या तक्रारीनंतर विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान समोर आले की, निखिल भोईर हा सराईत भामटा असून त्याच्यावर यापूर्वीच 6 गुन्हे दाखल आहेत, ज्यापैकी 4 गुन्हे हे केवळ फसवणुकीचे आहेत. विष्णुनगर पोलिसांनी सापळा रचून डोंबिवली पश्चिम येथील गुप्ते रोड परिसरातून त्याला अटक केली. उद्या त्याला कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे.

( नक्की वाचा : Kalyan News: बैठक सुरू झाली अन् अचानक 60 - 70 जण घुसले; कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या शाखेत जोरदार राडा )

निखिल भोईरने आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे, याचा सविस्तर तपास पोलीस आता करत आहेत. मोठ्या नावांचा वापर करून आणि बड्या व्यक्तींना लक्ष्य करून त्याने कोट्यवधींची माया जमवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा भामटा पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने डोंबिवलीतील अनेक नामांकित व्यक्तींनी सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी या घटनेमुळे सर्वसामान्यांपासून बड्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांनीच सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com