जाहिरात

पहाटे 5 ची वेळ, डोंबिवलीतील पलावा सिटीमध्ये 100 पोलिसांची गस्त; अखेर 'तो' सापडला, नेमकं काय आहे प्रकरण?

डोंबिवलीतील पलावा सिटीमध्ये ठाणे पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई केल्याचं समोर आलं आहे.

पहाटे 5 ची वेळ, डोंबिवलीतील पलावा सिटीमध्ये 100 पोलिसांची गस्त; अखेर 'तो' सापडला, नेमकं काय आहे प्रकरण?

Navi Mumbai : डोंबिवलीतील पलावा सिटीमध्ये ठाणे पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई केल्याचं समोर आलं आहे. गरुड ३ ऑपरेशन राबवत ठाणे पोलिसांनी संयुक्तरित्या मोठे “सर्जिकल स्ट्राइक” करत एकाच वेळी 16 ठिकाणी धाडसत्र राबविले. पहाटे पाच वाजल्यापासूनच पोलिसांनी संपूर्ण परिसरावर गुप्त पाळत ठेवली होती. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत तब्बल 25 अधिकारी आणि 100 पोलीस अंमलदारांच्या फौजफाट्यासह छापेमारी करण्यात आली. पलावा सिटी आणि खोणी गाव परिसरात झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली.

डोंबिवली पलावा सिटी परिसरातील मोठं ड्रग्ज रॅकेट उघड

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वाशी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील बडा आरोपी डोंबिवली येथील पलावा सिटी, खोणी गाव परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नवी मुंबई पोलीस आणि ठाणे पोलीस यांनी संयुक्तरित्या मोठे “सर्जिकल स्ट्राइक” करत एकाच वेळी 16 ठिकाणी धाडसत्र राबविले. या धाडसत्रादरम्यान 25 आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये 14 पुरुष, 7 महिला आणि 4 बालकांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात अनेकांकडे वैध पासपोर्ट, व्हिसा आणि इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

नक्की वाचा - Navi Mumbai: बेपत्ता मुलीचा शोध घेण्याची मागणी करणाऱ्या पालकांवरच गुन्हा दाखल; रबाळे पोलीस स्टेशनमधील प्रकार

तसेच हे नागरिक एमएमआर परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचंही तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नवी मुंबई पोलिसांना शोध घेत असलेला एक प्रमुख आरोपी यावेळी ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईत मोठं ड्रग्स नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उर्वरित आफ्रिकन नागरिकांची चौकशी, कागदपत्रांची पडताळणी आणि इतर तपास मानपाडा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सुरू आहे. या कारवाईमुळे एमएमआर परिसरातील अमली पदार्थांच्या रॅकेटविरोधात पोलिसांनी मोठा आघात केल्याचे मानले जात आहे.

नवी मुंबई परिसरात मोठी चर्चा...

दरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ड्रग्सविरोधात विशेष मोहीम उघडली असून त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या कारवायांना “गरुड 1” आणि “गरुड 2” अशी नावे देण्यात आली होती. आता झालेल्या या सर्वात मोठ्या धाडसत्राला “गरुड 3” असे नाव देण्यात आले असून हे ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी ठरल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या कारवाईनंतर डोंबिवली, पलावा सिटी आणि नवी मुंबई परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com