
योगेश शिरसाट, प्रतिनिधी
राज्य सरकार महिला सन्मानाचे गोडवे गात असतानाच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी (ST Corporation employees) स्वतः मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच बसमधून जबरदस्तीने उतरवून दिल्याची घटना समोर आली आहे. दुसरीकडे मूर्तीजापूर शिवशाही बसमधूनही एका महिला अँकरला तिकीट न देता मध्येच उतरवण्यात आलं. या दोन घटनांनी एसटी व्यवस्थेतील गलथानपणा आणि महिलांविषयीचा बेजबाबदार दृष्टिकोन पुन्हा अधोरेखित केला आहे. तिरोडा अकोट बसमध्ये तिकीट मशीन बिघडल्याचे कारण देत वाहक आर आर वाघमारे यांनी त्यांना अमरावतीजवळ जबरदस्ती महिलांना बसमधून खाली उतरून दिले होते.
त्या महिलांना अमरावतीत रात्र काढावी लागली होती. आता ही घटना ताजी असताना दुसरी घटना समोर आली आहे. पंढरपूरवरून निघालेल्या अकोल्याच्या दिशेने येणाऱ्या अकोटच्या बसमधील वाहक-चालक चक्क दारू प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला बसमधून खाली उतरून दिल्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. आता तर 37 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ही चालक वाहक बस चालवत होते आणि ही बस आगार अकोट डेपोची असल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : विद्यादीप बालगृहात धर्मासाठी दबाव; पोलिसांच्या अहवालात धक्कादायक बाबी उघड
दरम्यान पंढरपूरहून अकोट येणाऱ्या एम.एच. 14 - 6140 क्रमांकाची बस अकोटकडे प्रवास करत होती. चालक संतोष रहाटे व वाहक संतोष झालटे हे दारूच्या नशेत बस चालवत होते. यावर बीड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संतप्त प्रवाशांकडून याबाबत तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार बीड ते अकोला जिल्ह्याच्या रस्त्यावर घडला आहे. बीड जिल्ह्याच्या एसटी अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी संबंधित चालक व वाहकाला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केल्यानंतर त्या दोघांनीही दारू प्यायल्याचं समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या प्रकरणी सर्व घटनेचा खुलासाचे पत्र अकोला परिवहन अकोला विभागाला पाठवण्यात येणार आहे. या दोघांची तत्काळ चौकशी करून वैद्यकीय तपासणीनुसार दारू पिण्याचे निष्पन्न झाल्यास निलंबन किंवा बडतर्फची कारवाई चालक वाहकांवर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर बसमधील झालेला सर्व प्रकारचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान दोनच दिवसापूर्वी महिलांसोबत उद्धटपणाचा एक व्हिडिओ अकोटच्या डेपोमध्ये दिसून आला होता. तर आता चक्क पंढरपूरवरून येणाऱ्या या बसमध्ये 37 वारकरी महिलां प्रवाशांचा जीव धोक्यात घालून हा धक्कादायक प्रकार चालक वाहकाने केल्यामुळे संतप्त तीव्र प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
पंढरपूर अकोला बसमधील नेमका काय आहे प्रकार..
आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून महिला या पंढरपूरला विठू माऊलीच्या दर्शनाला जातात. तशाच काही मुर्तीजापुर आणि अकोटच्या महिला या पायी पंढरपूरला दर्शनाला गेल्या असल्याचं समोर आलं. एकंदरीत परतीच्या प्रवासानंतर पंढरपूरवरून अकोल्याला निघालेल्या बसमध्ये काही मुर्तीजापुरच्या महिला सुद्धा प्रवास करीत होत्या. अशावेळी बस कंडक्टर हा दारूच्या नशेत एसटीमध्ये बसलेला होता. कंडक्टरला दारू एवढी चढली की त्याला कुठलेही भान नव्हते. अशावेळी बाहेर एकीकडे पाऊस सुरू होता तर दुसरीकडे एसटी कंडक्टर हा दारूच्या नशेत मग्न होता. यावर बीड पोलीस स्टेशनला बसमधील प्रवाशांनी तक्रार केली असून एसटी प्रशासनाने दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या दोघांवरही आता एसटी परिवहन महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला अशाप्रकारे एसटी चालक वाहक त्रास देत असतील तर हे कितपत योग्य आहे. दिवसेंदिवस आता एसटीमध्ये घडत असलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं या व्हिडिओवरून आता दिसून येऊ लागला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world