पानसरे कुटुंबाचं ATS कडे लेखी निवेदन, सनातन संस्थेवर कारवाई होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त

पुरावे समोर असतानाही ATS कडून तपासात होत असलेल्या हलगर्जीपणावर पानसरे कुटुंबाने नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement
Read Time: 4 mins
कोल्हापूर:

ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करत असलेल्या ATS च्या कार्यपद्धतीवर पानसरे कुटुंबाने नाराजी व्यक्त केली आहे. पानसरे कुटुबांनी ATS चे पुणे विभागाचे अधिक्षक जयंत मीना यांच्याकडे ६८ पानी लेखी निवेदन सादर केलं आहे. या निवेदनात पोलीस तपासातून, पानसरे यांच्या हत्येत सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे पुरावे नमूद करण्यात आले आहेत. पुरावे समोर असतानाही ATS कडून तपासात होत असलेल्या हलगर्जीपणावर पानसरे कुटुंबाने नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने ATS ला पानसरे कुटुंबाची बाजू जाणून घेण्याचे आदेश दिले होते, ज्यानंतर पानसरे कुटुंबाने लेखी निवेदनाद्वारे आपली बाजू मांडली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे न्यायालयाने नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावली होती. यानंतर सनातन संस्थेद्वारे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विचारवंतांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचे पुरावे समोर आले होते. पानसरे कुटुंबाने आपल्या लेखी निवेदनात हेच पुरावे ATS अधिकाऱ्यांना सादर केले आहेत.

Advertisement

ATS ला दिलेल्या निवेदनात पानसरे परिवाराने सनातन संस्थेने मोठ्या प्रमाणात आपल्याकडे असलेल्या संघटनात्मक शक्ती, पैसा आणि साधकांचा वापर करत हत्या कशा केल्या...त्याच्यासाठी शस्त्र चालवण्याचे ट्रेनिंग कँप कसे घेतले, विचारवंतांच्या नेहमीच्या हालचालींवर कसं लक्ष ठेवलं, शस्त्रास्त्र कशी गोळा गेली याबद्दलची माहिती दिली आहे. पानसरे परिवाराने या निवेदनात ATS ला सनातन संस्थेचे प्रमुथ जयंत आठवले, विरेंद्र मराठे आणि अन्य अधिकारी वर्गाचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

२०१५ साली कोल्हापुरात अज्ञात मारेकरांनी कॉ. गोविंद पानसरे यांची गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येत सनातन संस्थेचा सहभाग असल्याचा संशय आहे. यानंतर २०१५ सालीच कर्नाटकात विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांचीही अशाच पद्धतीने हत्या झाली. त्यानंतर २०१७ मध्ये बंगळुरुत पत्रकार गौरी लंकेश यांनाही अशाच पद्धतीने संपवण्यात आलं होतं.

Advertisement

कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत दाखल झालेल्या पाच आरोपपत्रांचा हवाला देत पानसरे कुटुंबाने सर्व संशयित आरोपी हे सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीचे सदस्य असल्याचं म्हटलं आहे. यातील दोन आरोपी हे फरार घोषित करण्यात आले असून काही आरोपींचं दाभोलकर हत्या प्रकरणातील तपासातही नाव समोर आलं होतं. यामुळेच पानसरे-दाभोलकर हत्या प्रकरणात समान धागा असल्याचं पानसरे कुटुंबाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

आपल्या निवेदनात यावेळी पानसरे कुटुंबाने ATS तपासयंत्रणा सनातन संस्थेकडे डोळेझाक करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. "आम्ही जाणतो की आपण (एटीएस) आणि CBI, महाराष्ट्र पोलीस, कर्नाटक पोलीस, आणि गोवा पोलीस ह्या चार हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सनातन संस्थेचा सहभाग असल्याचं जाणून आहात. परंतु या संस्थेची अद्याप चौकशी का झाली नाही याची कारणं तुम्हीच (ATS) सांगू शकता. याचसाठी जयंत आठवले, विरेंद्र मराठे आणि सनातन संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे".

पानसरे कुटुंबाने सनातन संस्थेवर आपला संशय सिद्ध करण्यासाठी रमेश गडकरी आणि विक्रम भावे या दोन आरोपींनी केलेल्या बॉम्ब स्फोटाचा दाखला दिला आहे. पनवेल, ठाणे, वाशी या ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांमध्ये दोन्ही आरोपींना शिक्षा झाली आहे. SIT ने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये सनातन संस्थेशी निगडीत सदस्य हे या हत्या करण्यासाठी लागणारा शस्त्रसाठा मिळवण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि देशाच्या इतर भागात फिरुन आल्याचंही पानसरे कुटुंबाने आपल्या लेखी निवेदनात दाखवून दिलं आहे.

आपल्या विचारसरणीच्या विरोधात आणि हिंदूंविरोधात वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींची हत्या करण्याचा प्लान सनातन संस्थेच्या सदस्यांनी आखल्याचं पानसरे कुटुंबाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. यासाठी त्यांनी दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद काळस्कर, अमोल काळे यांनी दिलेला कबुली जबाबही निवेदनात नमूद केला आहे.

यापुढे पानसरे कुटुंबाने आपल्या निवेदनात सनातन संस्थेच्या क्षात्रधर्म साधना, दुर्जन, इश्वरी राज्य या पुस्तकांचा दाखला दिला आहे. ज्यात हिंदू धर्माविरोधात वक्तव्य करणाऱ्यांना संपवण्याची भाषा केली जात असल्याचं पानसरे कुटुंबाने म्हटलं आहे. शस्त्रास्त्र ते ड्रग्ज अशा अनेक प्रकरणांमध्ये आतापर्यंत सनातन संस्थेचं नाव समोर आल्याचं पानसरे कुटुंबाचं म्हणणं आहे. परंतु ATS सारख्या संस्थेने या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केल्याचं आम्हाला आश्चर्य वाटत असल्याचं पानसरे कुटुंबाने म्हटलं आहे. याचसोबत सतानत संस्थेला मिळत असलेल्या आर्थिक रसदीचाही ATS ने योग्य पद्धतीने तपास केला नसल्याचं पानसरे कुटुंबाने म्हटलं आहे. कुठल्यातरी मोठ्या व्यक्तीचा पाठींबा असल्याशिवाय डॉ. विरेंद्र तावडे आणि अमोल काळे यासारख्या व्यक्तींकडे इतकी मोठी रक्कम येणं शक्य नसल्याचं पानसरे कुटुंबाचं म्हणणं आहे. या प्रकरणात कोर्ट पुढची सुनावणी १२ जुलैला घेणार आहे.