Gadchiroli News : दहशतीचं प्रतीक असलेली 44 माओवादी स्मारके उद्ध्वस्त, गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माओवाद्यांकडून अतिदुर्गम भागांमध्ये माओवादी स्मारकांची निर्मिती केली जात होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

Gadchiroli News : दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला गडचिरोली जिल्हा हा माओवाददृष्टया अतिसंवेदनशील आहे. येथील जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माओवाद्यांकडून अतिदुर्गम भागांमध्ये माओवादी स्मारकांची निर्मिती केली जात होती. मात्र गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाकडून राबविल्या जाणा­ऱ्या प्रभावी माओवादविरोधी अभियानांमुळे जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळजवळ संपुष्टात आली असून सामान्य नागरिकांच्या मनात माओवाद्यांची असलेली भीती कमी होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाकडून माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेले जिल्हाभरातील एकूण 44 माओवादी स्मारके आज 18 फेब्रुवारी रोजी नष्ट करण्यात आले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी माओवाद्यांनी जनतेच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी स्मारक उभारले असल्याचं निदर्शनास आलं होते. यावरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने सुरक्षा आणि उपाययोजना करून   18 फेब्रुवारी रोजी 16 बिडीडीएस पथक, विशेष अभियान पथक, सीआरपीएफ व विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील मिळून एकूण 18 पथकातील जवानांनी जंगल परिसरात शोध अभियान सुरू केले होते. यादरम्यान एकूण 15 पोस्टे/उपपोस्टे/पोमकें हद्दीतील एकूण 44 स्मारके माओवाद्यांनी बांधलेली असल्याचे सापडले. 

नक्की वाचा - Nagpur Police Bharti: डॉक्टर, इंजिनिअर अन् फॅशन डिझायनर; पोलीस भरतीच्या रांगेत उच्चशिक्षितांची मोठी गर्दी

माओवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त...

या माओवादी स्मारकांची आणि परिसराची बिडीडीएस पथकाने कसून तपासणी केली आणि त्यानंतर जवानांनी ही स्मारकं उद्ध्वस्त केली आहेत. यामध्ये एटापल्ली उपविभागातील 18, हेडरी उपविभागातील 17, भामरागड उपविभागातील 05, जिमलगट्टा उपविभागातील 02, धानोरा उपविभागातील 01 आणि पेंढरी उपविभागातील 01 असे एकूण 44 माओवादी स्मारकांचा समावेश आहे. माओवाद्यांचे आश्रय स्थान समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी आणि गट्टा इत्यादी गावातील माओवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त करून गडचिरोली पोलीस दलाने परिसरातील नागरिकांमध्ये माओवाद्यांची असलेली दहशत संपवलेली आहे. ही केवळ भौतिक स्मारके नसून माओवाद्यांच्या हिंसाचार आणि दहशतीची निशाणी होते. मात्र गडचिरोली पोलीस दलाने ही स्मारके नष्ट केल्याने ग्रामस्थांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण होऊन पोलीस दलाप्रती आणि प्रशासनाप्रती त्यांचा विश्वास वृद्धिंगत झाला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. आणि पोलीस उप-अधीक्षक (अभियान)  विशाल नागरगोजे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना पार पाडली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितलं की, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली असून जिल्ह्रातील नागरिकांसाठी सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल नेहमीच प्रयत्नशील आहे. पोलीस दल खंबीरपणे जिल्ह्यातील नागरिकांच्या पाठीशी उभे असून कोणीही माओवाद्यांच्या भूलथापांना बळी पडू नये.

Advertisement