- भोपाळमध्ये महाराष्ट्रातील 33 वर्षीय तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला
- तरुणीची गळा दाबून हत्या झाल्याचा संशय, आरोपी फरार
- सिया आणि समीरची ओळख इन्स्टाग्रामवरून झाली होती आणि सिया समीरसोबत भोपाळमध्ये राहत होती
Gondia News: मध्य प्रदेशातील भोपाळ येथे महाराष्ट्रातील तरुणीसोबत अतिशय भयंकर घटना घडलीय. भोपाळच्या निशातपुरा परिसरातील एका रिकाम्या प्लॉटमध्ये बांधलेल्या सेप्टिक टँकमधून गुरुवारी (12 फेब्रुवारी) संध्याकाळच्या सुमारास 33 वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. या धक्कादायक घटनेचा पोलिसांनी केवळ 24 तासांत उलगडा केलाय. या घटनेमागे प्रेम, विश्वासघात, ब्लॅकमेल आणि हत्या अशी गुंतागुंतीची कहाणी असल्याचे सांगितले जातंय. या भयानक कथेची सुरुवात इन्स्टाग्रामवरुन होऊन शेवट सेप्टिक टँकपर्यंत झालाय. मृत महिला मूळची महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील होती, असे म्हटलं जातंय. अशरफी उर्फ सिया असे तिचे नाव होते.
विवाहित प्रियकराने केली सियाची हत्या
प्राथमिक तपासानुसार, सियाची हत्या सोमवारी ( 9 फेब्रुवारी) तिचा विवाहित प्रियकर समीरने केली. या गुन्ह्यात त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांची मदत घेतल्याचा आरोप आहे. समीरने गळा दाबून सियाची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह लोखंडी पेटीत भरून कमला नगर येथील त्यांच्या घराजवळील सेप्टिक टँकमध्ये टाकला.
(नक्की वाचा: Navi Mumbai News: नवी मुंबईकरांनो सावधान! तुम्हीही पनवेलमध्ये रिक्षाने प्रवास करताय? महिलेसोबत भयंकर घडलं)
इंस्टाग्रामवरील लव्हस्टोरीचा भीषण शेवट
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सिया आणि समीरची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. सुरुवातीला केवळ गप्पांपासून सुरू झालेले त्यांच्या मैत्रीच्या नात्याचं रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झालं. प्रेमात आकंठ बुडालेल्या सियाने समीरसाठी आपले घर सोडले आणि जवळपास तीन महिन्यांपूर्वी ती महाराष्ट्रातून भोपाळला येऊन समीरसोबत राहू लागली. समीरसोबत नवे आयुष्याला सुरुवात होईल, असे सियाला वाटलं होतं. पण प्रत्यक्षात भयंकर घडलं. ज्या समीरसोबत ती आयुष्य एकत्र जगण्याचं स्वप्न पाहत होती. तो विवाहित होता, इतकंच नव्हे तर तो दोन मुलांचा बापही होता. सिया कमला नगर येथील त्याच्या घरी राहू लागली; पण त्यांच्यात रोज वाद होत होते. पोलीस सूत्रांनुसार, सिया आणि समीरची पत्नी यांच्यात वारंवार बाचाबाची होत असे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घरात जोरदार भांडणे व्हायची. समीरने सियापासून अनेक गोष्टी लपवल्यामुळे त्यांच्यातील तणाव वाढत गेला.
सियाचा समीरवर लग्नासाठी दबावतपास अधिकाऱ्यांच्या मते, सिया सतत समीरवर लग्नासाठी दबाव टाकत होती. समीरने लग्नास नकार दिल्यानंतर तिने पाच लाख रुपयांची मागणी केली आणि कायदेशीर कारवाईची धमकी दिल्याचेही सांगितले जातंय. परिस्थिती तणावपूर्ण होऊ लागली. तणाव इतका वाढला की समीरची पत्नी कथितपणे आपल्या माहेरी जबलपूरला निघून गेल्याचे म्हटलं जातंय.
सोमवारी संध्याकाळी सिया आणि समीर यांच्यात पुन्हा मोठा वाद झाला. रागाच्या भरात समीरने सियाचा गळा दाबला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने आपल्या भाऊ, आई आणि बहिणीच्या मदतीने तिचा मृतदेह लोखंडी पेटीत बंद करून रात्री उशीरा रात्री घराजवळील रिकाम्या प्लॉटमधील सेप्टिक टँकमध्ये टाकला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
(नक्की वाचा: Pune Crime Alert: गुंड मोकाट, पुणेकर धास्तावले! गुंडांचा मध्यरात्री तलवारींनी तांडव आणि दगडफेक, पाहा VIDEO)
सेप्टिक टँकमध्ये आढळला मृतदेहगुरुवारी (12 फेब्रुवारी) संध्याकाळच्या सुमारास खेळणाऱ्या मुलांना टँकमधून दुर्गंध येऊ लागला. ही गोष्ट त्यांनी घरच्या मंडळींना सांगितली. पाहणी करताना टँकमध्ये लोखंडी पेटी तरंगताना दिसली. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता पेटीत सियाचा कुजलेला मृतदेह आढळला. मृतदेह इतका कुजलेला होता की शरीरावरील जखमा स्पष्ट दिसत नव्हत्या. पण तिच्या हातावरील ‘दीपक' नावाचा टॅटू आणि जन्मतारखेच्या आधारे तिची ओळख पटली.
निशातपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज पटवा यांनी सांगितले की, मृतदेह तीन ते चार दिवस जुना असावा. प्राथमिक तपासात गळा दाबून हत्या केल्याचा संशय आहे. आरोपी समीर सध्या फरार असून पोलिसांनी त्याचा भाऊ, आई आणि बहिणीला अटक केलीय. समीरच्या पत्नीचीही चौकशी केली जाणार आहे. पोलीस सूत्रांनुसार, सियाचे यापूर्वी महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये तीन वेळा लग्न झाले होते. फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world