जाहिरात

Sambhajinagar : स्वस्त गोरेपणाच्या नादात आयुष्य पणाला; पाकिस्तानी उत्पादनांचा संभाजीनगरमध्ये धुमाकूळ

Chhatrapati Sambhajinagar Pakistani Cream Racket : झटपट गोरे करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांच्या जाळ्यात अनेक तरुण-तरुणी अडकले आहेत.

Sambhajinagar : स्वस्त गोरेपणाच्या नादात आयुष्य पणाला; पाकिस्तानी उत्पादनांचा संभाजीनगरमध्ये धुमाकूळ
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क पाकिस्तानी क्रिमनं धुमाकूळ घातला आहे.
छत्रपती संभाजीनगर:

सागर जोशी, प्रतिनिधी

Chhatrapati Sambhajinagar Pakistani Cream Racket : दिसायला सुंदर किंवा गोरं असणं हीच तुमची ओळख असू शकते का? आजच्या धावपळीच्या युगात आणि सोशल मीडियाच्या प्रभावाखाली वावरणाऱ्या तरुणाईला हे पटवून देणं कठीण झालं आहे. याच मानसिकतेचा फायदा घेत काही रॅकेट सक्रिय झाले असून, गोरे होण्याच्या अट्टाहासापोटी तरुणाई स्वतःच्या आयुष्याशी खेळत असल्याचे धक्कादायक वास्तव छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आले आहे. स्वस्तात मिळणाऱ्या आणि झटपट गोरे करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांच्या जाळ्यात अनेक तरुण-तरुणी अडकले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजीनगरमधील शहागंज, घासमंडी आणि सिटी सेंटर मॉल परिसरातील तीन मोठ्या दुकानांवर पोलिसांनी एकाच वेळी धाडी टाकल्या. या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पाकिस्तानी उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये मल्लिका, नूर हर्बल, चांदणी, झलक, गोरे, गोल्डन पर्ल, उजूबा, फेस फ्रेश आणि न्यू फेस यांसारख्या क्रीम्सचा समावेश आहे. 

Latest and Breaking News on NDTV

याशिवाय पारले गोल्ड साबण आणि मल्लिका व्हिटॅमिन-C सिरम यांसारखी घातक उत्पादनेही पोलिसांना आढळून आली आहेत. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी या संपूर्ण कारवाईची माहिती दिली असून या तस्करीमागील साखळीचा तपास सुरू केला आहे.

( नक्की वाचा : Shirdi News: शिर्डीच्या आकाशात विमानाच्या घिरट्या अन् खाली वैजापूरकरांचा काळजाचा ठोका चुकला! काय घडलं नेमकं? )

गोरेपण नाही तर थेट किडनीवर आघात

या प्रकरणातील सर्वात भयावह बाजू म्हणजे या क्रीम्सचे शरीरावर होणारे परिणाम. ही उत्पादने वापरल्याने माणूस गोरा होतो की नाही हा संशोधनाचा विषय असला, तरी यामुळे शरीराचे महत्त्वाचे अवयव निकामी होत असल्याचे सिद्ध झाले आहे. 

किडनीविकार तज्ज्ञ डॉ. श्रीगणेश बरनेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाकिस्तानी क्रीम्समध्ये पारा (Mercury) आणि इतर अत्यंत घातक रसायनांचा वापर केला जातो. ही रसायने त्वचेवाटे शोषली जाऊन थेट रक्तात मिसळतात आणि त्याचा सर्वात मोठा फटका किडनीला बसतो. या रसायनांमुळे अनेकांच्या किडन्या निकामी झाल्याचे प्रकार आता समोर येत आहेत.

( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवली हादरली! पालिका अधिकाऱ्या महिला कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲप कॉल; सेटलमेंटसाठी मागितलं 'सुख' )

पीडित तरुणाची आपबिती आणि तज्ज्ञांचा इशारा

या उत्पादनांच्या भीषणतेवर शिक्कामोर्तब करणारा अनुभव सलमान शेख या पीडित रुग्णाने मांडला आहे. जाहिरातींना भुलून आणि स्वस्तात मिळणाऱ्या क्रीम्सचा वापर केल्याने आरोग्याच्या कशा समस्या निर्माण होतात, हे त्याने सांगितले. केवळ जाहिरातींवर विश्वास ठेवून कोणतेही क्रीम किंवा साबण वापरल्याने माणूस गोरा होत नाही, हे विदारक सत्य आता लोकांसमोर आले आहे. या सौंदर्य प्रसाधनांमुळे केवळ त्वचेवरच परिणाम होत नाही, तर शरीरातील अंतर्गत अवयवही कायमचे निकामी होऊ शकतात.

छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे केवळ तस्करीचा मुद्दाच नाही, तर सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्नही ऐरणीवर आला आहे. कोणतीही क्रीम वापरण्यापूर्वी किंवा सौंदर्य उपचार घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. केवळ गोरे दिसण्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणे किती महागात पडू शकते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे तरुण-तरुणींनी आपली ओळख रूपापेक्षा कर्तुत्वावरून निर्माण करावी आणि अशा जीवघेण्या उत्पादनांपासून लांब राहावे, असे आवाहन प्रशासन आणि आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com