पावसात मंदिराशेजारी मित्रासोबत गप्पा मारत उभा होता अन् आला मृत्यू; धक्कादायक प्रकार समोर

बाहेर पाऊस सुरू असताना दोन मित्र मंदिराशेजारी गप्पा मारत उभे होते. यादरम्यान एका मित्राचा मृत्यू झाला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बुलढाणा:

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात तुफान पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी वीज पडल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. दरम्यान बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बाहेर पाऊस सुरू असताना दोन मित्र मंदिराशेजारी गप्पा मारत उभे होते. यादरम्यान एका मित्राचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे झाडाची फांदी डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बिबवेवाडीतील पोकळे वस्ती परिसरात शनिवारी रात्री घडली. 

योगेश ज्ञानदेव वानेरे (वय २९, सध्या रा. पोकळे वस्ती, बिबवेवाडी, मूळ रा. वाघूड, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. रात्री साडेअकराच्या सुमारास योगेश वानेरे आणि त्याचा मित्र सुमित बगाडे ओटा वसाहतीतील महादेव मंदिराजवळ गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी झाडाची मोठी फांदी तुटली आणि योगेशच्या डोक्यात पडली. योगेशचा मित्र सुमित बचावला. झाडाची फांदी डोक्यात पडल्याने योगेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

नक्की वाचा - अग्रवाल पिता-पुत्रांवर आणखी एक गुन्हा दाखल, आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार

दरम्यान महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पालिकेने पावसाळ्यापूर्वी करावयाची कामं केलेली नाहीत, त्यामुळे योगेशचा जीव गेला असा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे.