समाधान कांबळे
गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याची एक छोटी चुक त्याला गजाआड पोहोचवते. पोलिस हीच एक चुक शोधतात आणि अशा गुन्हेगारांना अलगद आपल्या जाळ्यात अडकवतात. अशाच एका गुन्ह्याचा छडा लावण्यात हिंगोली पोलिसांना लावण्यात यश आलं आहे.एक तरुणीचा मृददेह पोलिसांना सापडला होता. पण सहा दिवस झाले तरी तो मृतदेह कोणाचा आहे आणि तिचा खुन कुणी केला आहे याचा पत्ताच पोलिसांना लागत नव्हता. अशा स्थितीत पोलिसांनी पुन्हा एकदा मृतदेह सापडला त्या ठिकाणी शोधाशोध केली. त्यावेळी त्यांना तिथे डी मार्टच्या बिलाची पावती तिथे सापडली. त्यानंतर तपासाची चक्र अशी फिरली की आरोपी अलगद जाळ्यात अडकला. एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच हा घटनाक्रम आहे. तपासानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्याने पोलिस चक्रावून गेले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी शिवारामध्ये 24 डिसेंबर रोजी अज्ञात मुलीचा मृतदेह आढळला होता. एका बॅगमध्ये भरून हा मृतदेह शिवारात टाकण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शवविच्छेदन अहवालात तरुणीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. यावरून 25 डिसेंबरला औंढा नागनाथ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला. पण घटनास्थळावर मृत मुलीची ओळख पटविण्यासारखा पोलिसांना काहीही पुरावा सापडला नाही. त्यामुळे आधी त्या मुलीची ओळख पटवणे आणि नंतर खुन्याला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. शिवाय कोणताही पुरावा त्यांच्या हातात नव्हता.
अशा स्थितीत औंढा नागनाथ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तरुणीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा पोलिस घटनास्थळी गेले. त्यांनी परिसराची पाहणी केली. तेथे एका डी मार्टची पावती त्यांना सापडली. त्यावरील माहितीच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील जाऊन तरुणची ओळख पटवली. शिवाय डी मार्टच्या सीसीटीव्ही पण पोलिसांनी चेक केला. त्यानंतर सर्व गोष्टी समोर यायला लागल्या.
डी मार्टच्या सीसीटीव्हीतून पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करण्यास मदत झाली. छत्रपती संभाजीनगर येथे एक तरुण गेल्या नऊ महिन्यापासून या मृत तरुणी बरोबर रिलेशनशिपमध्ये रहात होता. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाची माहिती घेतली. तो नांदेड जिल्ह्यातील मुगट येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला. त्यावेळी तो तेलंगणा मधील आदिलाबाद येथे नातेवाईकांकडे गेल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. पोलिसांनी आदिलाबाद येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.
ज्या तरुणीचा खुन करण्यात आला तिचं नाव अलका बेद्रे होते. ती 29 वर्षाची होती. ती अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवाशी होती. या मुलीची आणि आरोपी श्रीकांत विलनवार या मुलाची बीड जिल्ह्यात प्रवास करत असताना एका बस मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर एकमेकांना मोबाईल नंबर दोघांनी दिले होते. त्यांची मैत्री झाली. पुढे दोघांचे प्रेम ही झाले. मागील नऊ महिन्यापासून लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना दोघांमध्ये वाद होत होते. त्यातून श्रीकांत याने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. श्रीकांत पिलानवार याने अलका हिचा गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर एका बॅगमध्ये अलकाचा मृतदेह टाकून छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे निघाला. मात्र त्याला प्रवासी वाहन मिळाल्याने हे प्रवासी वाहन मिळाले. ते हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथपर्यंत जात होते. त्यामुळे तो औंढा नागनाथ येथे आला. त्यानंतर त्याने वगरवाडी शिवारातील रोडच्या कडेला असलेल्या मानवनिर्मित जंगलामध्ये या मुलीचा मृतदेह फेकून दिला. अशी कबुली त्यांने पोलिस चौकशीत दिली आहे.
ट्रेंडिंग बातमी - Tourism News: महाबळेश्वर, लोणावळ्या बरोबर 'हे' थंड हवेचे ठिकाणी झालं हाऊसफुल पण...
ही घटना घडून जवळपास सहा दिवस उलटले तरीही गुन्ह्याची उकल होत नव्हती मात्र एका डी मार्ट च्या पावतीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील जीएस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसैन घेवारे संतोष शेकडे उपनिरीक्षक विक्रम विठू होणे यांच्यासह संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नानंतर या संपूर्ण खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे.