Pune dadus shop : पुण्यातील प्रसिद्ध 'दादू'ज कॅम्प आऊटलेटमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील दादूज येथील मिठाई पुणेकरांमध्ये प्रसिद्ध आहे. दिवाळीत तर येथील मिठाईची मोठी मागणी असते. अनेक कर्मचाऱ्यांनाही दिवाळीनिमित्त दादूज येथील मिठाई भेट म्हणून दिली जाते. अशाच एका बॉक्समध्ये मानवी नख आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे दादूज मिठाई दुकानातील स्वच्छतेचा मुद्दा उपस्थिती केला जात आहे.
एका बांधकाम व्यावसायिकाने दिवाळीसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांकरिता ७५ हजार रुपये किमतीची मिठाई दादू'ज स्वीट मार्टमधून खरेदी केली होती. मिठाई खात असताना एका कर्मचाऱ्याला काजू कतली मध्ये मानवी नखाचा तुकडा आढळला.
या व्यावसायिकाने तत्काळ दुकानाशी संपर्क साधला, पण दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर व्यावसायिकाने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. व्यवसायिकाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दुकानाशी संपर्क साधला तेव्हा कर्मचाऱ्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही आणि कोणतीही चौकशी सुरू केली नाही किंवा कोणतीही कारवाई केली नाही. यातून दादू'जमधील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे.
साधारण आठवडाभरापूर्वी ध्रुव मेहता नावाच्या व्यक्तीने दादूजच्या दुकानातील मोतीचूर लाडूमध्ये केस आढळून आल्याचं निदर्शनास आढळून दिलं आहे. मात्र यावर दुकानदारांनी काहीच प्रतिक्रिया किंवा साधा खेदही व्यक्त केला नसल्याचं ग्राहकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.