
मंगेश जोशी
जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात पतीने पत्नीला कारखाली फरफटत नेत पत्नीवर जीव घेणा हल्ला केला. ही धक्कादायक घटना समोर आली आहे.कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने हे घृणास्पद कृत्य केले आहे. पतीने तिला कारने फरफटत नेले. त्यामुळे त्यांना खोलवर जखमा झाल्या आहेत. शिवाय शरीराची कातडी फाटून विवाहिता गंभीर जखमी झाली आहे. विवाहितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून पती रेवन प्रमोद पवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर रेवन पवार हा फरार झाला आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जिल्ह्यातील पाचोरा येथे राहणारा रेवन प्रमोद पवार याचा भडगाव येथील तृप्ती पाटील हिच्याशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या विवाहानंतर दोघांना मुलगी झाली. मात्र गेल्या सहा महिन्यापासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद होत होते. त्यामुळे तृप्ती आपल्या मुलीसह भडगाव येथे माहेरी गेली होती. रेवन पवार याने पत्नीच्या माहेरी येऊन पत्नी तृप्तीला शिवीगाळ करत मारहाण केली.
त्याच वेळी तृप्तीच्या बहिणीने तृप्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रेवन पवार याने तिलाही मारहाण केली. शिवाय तृप्ती कडून आपल्या मुलीला जबरदस्ती ओढले. मात्र अडवण्याचा प्रयत्न केल्याचा राग आल्याने रेवन पवार याने पत्नी तृप्तीवर थेट कार चढवली. परत कार मागे घेऊन काही अंतरापर्यंत तिला फरफटत नेत तिच्यावर जीव घेणा हल्ला केला. असा आरोप तृप्तीने केला आहे.
तशी तक्रार त्यांनी पोलीसांना दिली आहे. या फिर्यादीवरून रेवन प्रमोद पवार याच्या विरुद्ध भडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून रेवन पवारचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे तृप्ती पवार या विवाहितेच्या शरीरावर खोलवर घाव झाले आहेत. त्यांच्या शरीराची कातडी अक्षरश: फाटली असून गंभीरित्या जखमी झाल्या आहेत. त्या सध्या दवाखान्यात असून तृप्तीची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world