कल्याण हादरलं! रविवारी एकत्र सिनेमा, सोमवारी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; बापानंच विवाहित मुलीची हत्या केली?

Kalyan Crime News: कल्याण पश्चिमेकडील पारेकरवाडी भागात एका पित्यानेच आपल्या विवाहित मुलीची धारदार शस्त्राने हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या निर्घृण हत्येमागचे गूढ काय? वाचा सविस्तर माहिती

जाहिरात
Read Time: 2 mins
"Kalyan Crime News: बापानंच विवाहित मुलीची हत्या केली का? नेमकं सत्य काय?"
NDTV Marathi

- अमजद खान, प्रतिनिधी

Kalyan News: कल्याण पश्चिमेकडील पारेकरवाडी परिसरात एका पित्यानेच आपल्या पोटच्या विवाहित मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या कृत्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. गायत्री शिंदे असे मृत तरुणीचे नाव आहे तर आरोपी पिता विनोद वसईकर सध्या फरार आहे.

लग्नाला वर्षही झालं नाही, माहेरी मुलीची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, पारेकरवाडी येथील 'रचना रॉयल' इमारतीच्या फ्लॅट क्रमांक 102 मध्ये वसईकर कुटुंब वास्तव्यास आहे. विनोद वसईकर, त्यांची पत्नी आणि मुलगा देखील खासगी कंपनीमध्ये नोकरी करतात. मृत गायत्री हिचे नोव्हेंबर 2025 मध्ये लग्न झाले होते आणि ती काही दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी आली होती. रविवारी (24 मे) रात्रीपर्यंत सर्व काही सुरळीत होते. संपूर्ण कुटुंब एकत्र सिनेमा पाहण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर संध्याकाळी गायत्री तिच्या आई-वडिलांसोबत काळा तलाव परिसरात फिरायलाही गेली होती. बाहेरून पाहणाऱ्याला कुटुंबात कोणताही वाद असल्याचे जाणवत नव्हते.

Advertisement

हत्येची घटना कशी झाली उघड?

सोमवारी (25 मे) दुपारी गायत्रीने तिच्या आईला फोन करून सांगितले होते की, ती आणि वडील घरीच आहेत. पण रात्री जेव्हा आई कामावरून घरी परतली आणि तिने घराचा दरवाजा उघडला, तेव्हा समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. गायत्रीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह जमिनीवर पडलेला होता. आईने तातडीने आपल्या मुलाला आणि पोलिसांना याची माहिती दिली.

(नक्की वाचा: थेट RBIच्या तिजोरीवरच डल्ला! कचऱ्याचा डबा, 98 दिवसांचे गूढ मौन अन् आजारपणाची मोठी सुटी; असा रचला चोरीचा गेम)

सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचा पुरावा

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार गायत्रीची हत्या धारदार शस्त्राने वार करून करण्यात आली आहे. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक महत्त्वाची बाब समोर आली. आरोपी विनोद वसईकर सकाळी कामावर गेल्यानंतर काही वेळातच पुन्हा घरी परतला होता आणि दुपारी 4 वाजेच्या सुमारास तो अत्यंत घाईघाईने इमारतीतून बाहेर पडताना दिसून आला. तेव्हापासून तो बेपत्ता आहे.

(नक्की वाचा : Mira Road News: बकरी ईद आधी दोन गटांत राडा, बकऱ्यांवरून सोसायटीत दोन गट भिडले, ब्लेड हल्ल्याचा आरोप)

Advertisement

हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

स्वतःच्या मुलीची हत्या करण्याइतपत टोकाचे पाऊल विनोदने उचलले आहे का? तसे असेल तर मुलीची हत्या का केली? याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी तीन विशेष पथके रवाना केली आहेत. आरोपीला अटक केल्यानंतरच या निर्घृण हत्येमागचा नेमका हेतू स्पष्ट होईल