- अमजद खान, कल्याण
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. एकिकडे राजकीय रॅली-प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे काही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलीस सतर्क आहेत. याचेच उदाहरण कल्याणमध्ये पाहायला मिळते. एक तरुण भररस्त्यात बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच कल्याणमधील बाजारपेठ पोलिसांनी तीन मिनिटांत त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडील बंदूक देखील जप्त केली. केतन शंकर बोराडे असे या आरोपीचे नाव आहे. केतन बोराडे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली.
(नक्की वाचा: Jalebi Baba: 100हून अधिक महिलांवर बलात्कार करणाऱ्या जलेबी बाबाचा मृत्यू)
नेमके काय घडले?
निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. वाहनांसह सर्व ठिकाणी कसून तपासणी केली जात आहे. गर्दीचा फायदा घेत कोणीही कायदा हाती घेऊ नये, यासाठी पोलीस डोळ्यांत तेल घालून गस्त घालत आहे. दरम्यान कल्याण पश्चिमेकडे अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी वेळीच कारवाई केली. राममारुती मंदिर परिसरात एक तरुण बंदूक घेऊन फिरत आहे, अशी माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सचिन साळवी त्यांच्या सहकारी पोलिसांसोबत घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना पाहून बंदूक घेऊन फिरणाऱ्या तरुणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला.
(नक्की वाचा: डोंबिवलीत घरफोड्या करून उत्तर प्रदेशात बांधला आलिशान बंगला, चोरटे गजाआड)
काही मिनिटांतच पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पोलिसांनी पाठलाग करत अवघ्या काही मिनिटांतच केतन शंकर बोराडेच्या मुसक्या आवळल्या. केतनविरोधात गंभीर स्वरुपाचे 21 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. एका लुटीच्या प्रकरणात त्याला यापूर्वी शिक्षा देखील ठोठावण्यात आली आहे. जेलमधून सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा कायदा हाती घेतल्यानं पोलिसांनी त्याला अटक केली. रविवारी (12 मे) न्यायालयात हजर केले जाणार आहे. केतनकडून जप्त करण्यात आलेली बंदूक ही गावठी कट्टा प्रकारातील आहे. गावठी कट्ट्यासह एक मॅक्झिन आणि तीन जिवंत काडतूस देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान केतन हा बंदूक घेऊन का फिरत होता, यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
(नक्की वाचा: पतीसोबत झाले कडाक्याचे भांडण, पत्नीने दिव्यांग मुलाला फेकले मगरींच्या तोंडी; कारण...)