Kalyan News:पोलिसांच्या श्वानाने 'असा' शोधला खुनी मित्र! कल्याणजवळ नदीकाठी झालेल्या हत्येचा थरारक उलगडा

Kalyan News: या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांच्या  श्वान पथकाने दिलेली दिशा आणि 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan News: कल्याणजवळच्या खडवली नदी परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.
कल्याण:

Kalyan News: कल्याणजवळच्या खडवली नदी परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या हत्येचा उलगडा करण्यात टिटवाळा पोलिसांना मोठे यश आले असून, धक्कादायक बाब म्हणजे एका मित्रानेच केवळ 700 रुपयांच्या वादातून आपल्या मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांच्या  श्वान पथकाने दिलेली दिशा आणि 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरली.

काय आहे प्रकरण?

तीन दिवसांपूर्वी खडवली नदीकाठी एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलिसांना मिळाला होता. सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासासाठी पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली. यामधील बेली या श्वानाने घटनास्थळापासून थेट खडवली रेल्वे स्थानकापर्यंतचा मार्ग दाखवला, ज्यामुळे पोलिसांना तपासाची पहिली दिशा मिळाली. टिटवाला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे, पोलीस अधिकारी नितीन मुदगुन, महेश कदम तसेच ठाणे एलसीबीचे अधिकारी भाऊसाहेब गायकवाड आणि जयवंत वारे यांच्या पथकाने हा तपास केला.  खडवली ते मुंबई या दरम्यानचे सुमारे 300 सीसीटीव्ही फुटेज तपासले.

Advertisement

मृत्यूची पार्टी आणि...

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत राजेश प्रभुळकर आणि आरोपी योगेश कदम हे दोघेही जवळचे मित्र होते आणि एकत्र केटरिंगचे काम करत होते. घटनेच्या दिवशी हे दोघेही खडवली नदी परिसरात पोहण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी आले होते. 

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये भररस्त्यात थरार! घरी परतणाऱ्या तरुणाला गाठले आणि बांबूने फोडले; कारण काय? )

पार्टी सुरू असताना योगेशला असा संशय आला की, राजेशने त्याच्या खिशातील 700 रुपये चोरले आहेत. याच किरकोळ संशयावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या योगेशने जवळच पडलेला दगड उचलला आणि राजेशच्या डोक्यात घालून त्याची निर्घृण हत्या केली.

हत्या केल्यानंतर आरोपी योगेश कदम घटनास्थळावरून पसार झाला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग परिसरातून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, योगेश कदम हा आधीच मोबाईल चोरीच्या प्रकरणात वाँटेड होता आणि त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. टिटवाळा पोलिसांनी त्याला अटक केली असून आता या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

( नक्की वाचा : Dombivli News : ना भेट,ना बोलणं , थेट लॉजवर बोलावणं, डोंबिवलीच्या जावेदचा नातेवाईकांनी केला 'करेक्ट कार्यक्रम' )

अवघ्या 700 रुपयांसाठी एका माणसाचा जीव घेतल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. ज्या मित्रासोबत राजेशने पोहायला जाण्याचा बेत आखला होता, तोच त्याचा काळ ठरेल असे कोणालाही वाटले नव्हते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि श्वान पथकाच्या अचूक मार्गदर्शनामुळे हा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघड झाला.

Advertisement
Topics mentioned in this article