जाहिरात

Kalyan News: बॅगेत काहीच नाही, मग गांजा गेला कुठे? महिला पोलिसांच्या तपासणीत धक्कादायक गुपित उघड

Kalyan News: कल्याणमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीचा एक असा प्रकार उघडकीस आला आहे, ज्याने पोलीसही चक्रावून गेले.

Kalyan News: बॅगेत काहीच नाही, मग गांजा गेला कुठे? महिला पोलिसांच्या तपासणीत धक्कादायक गुपित उघड
Kalyan News: कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Kalyan News: कल्याणमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीचा एक असा प्रकार उघडकीस आला आहे, ज्याने पोलीसही चक्रावून गेले. ओडिशाहून गांजा आणण्यासाठी एका महिलेने चक्क आपल्या कपड्यांचा वापर एका गुप्त कोठारासारखा केला होता. महात्मा फुले पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

काय आहे प्रकरण?

महात्मा फुले पोलिसांना एका गुप्त खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, एक महिला ओडिशाहून मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन कल्याण रेल्वे स्थानकाजवळील साधना हॉटेल परिसरात येणार आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत डीसीपी अतुल झेंडे, एसीपी कल्याण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालकृष्ण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विकास मडके यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला.


( नक्की वाचा : Dombivli News: आधी अपहरण आता मारहाण! डोंबिवलीतील RPI नेत्यांचा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला! प्रकरण काय? )

बॅगेत काहीच नाही, मग गांजा गेला कुठे?

काही वेळातच माहिती मिळालेली संशयित महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली. पोलिसांनी सुरुवातीला तिची आणि तिच्याकडील बॅगेची कसून तपासणी केली. 

मात्र, बॅगेमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. यामुळे पोलीसही काही काळ गोंधळात पडले. मात्र, महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने महिला पोलिसांनी तिची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

( नक्की वाचा : Pune News: हिंजवडीत नाशिक प्रकरणाची पुनरावृत्ती? IT कंपन्यांमधील 'त्या' धक्कादायक प्रकाराची थेट सरकारकडून दखल )

कुठे लपवला होता गांजा?

महिला पोलिसांनी जेव्हा तपासणी केली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. या महिलेने आपल्या परकरमध्ये एक गुप्त कप्पा तयार केला होता. या कप्प्यात तिने तब्बल 4 किलो गांजा अत्यंत शिताफीने लपवून ठेवला होता. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून अनिता लव्हाळे नावाच्या या महिलेला अटक केली आहे. आरोपी महिला नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील रहिवासी असल्याचे तपासात समोर आले आहे.

अनिता लव्हाळे ही महिला अशाच प्रकारे वारंवार गांजाची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. ती ओडिशाहून हा गांजा नेमका कोणासाठी घेऊन आली होती आणि कल्याणमध्ये तिचे संपर्क कोणाशी आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून यामध्ये आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com