Kalyan News : कल्याणजवळील खडवली परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका सोनाराचे अपहरण करून त्याला 2 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणीची रक्कम न दिल्यास 'दरीमध्ये फेकून देऊ' अशी जीवघेणी धमकीही आरोपींनी दिली होती. सुदैवाने, या सोनाराने कसाबसा आरोपींच्या तावडीतून स्वतःची सुटका केली आणि थेट टिटवाळा पोलीस स्टेशन गाठले. टिटवाळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या खंडणीखोर टोळीतील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खडवली परिसरात उगम चौधरी यांचे 'लक्ष्मी ज्वेलर्स' नावाचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानासमोर एक कार येऊन थांबली. त्या कारमधून आलेल्या काही तरुणांनी उगम चौधरी यांना दुकानातून बळजबरीने बाहेर काढले आणि त्यांना गाडीत कोंबले. गाडीमध्येच त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी कार एका निर्जनस्थळी थांबवली.
( नक्की वाचा : Kalyan News: भयानक! 'उधारी' विचारणे दुकानदाराच्या जीवावर बेतले; कल्याणजवळ धक्कादायक प्रकार )
या निर्जनस्थळी थांबल्यानंतर आरोपींनी उगम चौधरी यांच्याकडे 2 लाख रुपयांची खंडणी मागितली. जर त्यांनी हे पैसे दिले नाहीत, तर त्यांना दरीत फेकून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या भयानक परिस्थितीत, उगम चौधरी यांनी हिंमत दाखवत मोठ्या शिताफीने आरोपींच्या तावडीतून स्वतःची सुटका केली आणि त्वरीत टिटवाळा पोलीस ठाणे गाठले.
सोनार उगम चौधरी यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर, टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्रे फिरवली.पोलिसांनी या प्रकरणी तत्पर कारवाई करत खंडणी मागणाऱ्या संजय पाटोळे, प्रतीक मारू आणि तेजस ठाकरे या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
( नक्की वाचा : Ulhasnagar: उल्हासनगरच्या राजकारणात मोठा भूकंप! खंडणी प्रकरणात ओमी कलानीच्या खास माणसाला अटक )
प्राथमिक तपासानुसार, आरोपी संजय पाटोळे आणि सोनार उगम चौधरी यांच्यामध्ये पूर्वी वस्तू गहाण ठेवण्यावरून वाद होता. या सामान्य वादाचे रूपांतर नंतर सोनाराचे अपहरण करून खंडणी मागणे आणि जीवे ठार मारण्याची धमकी देण्यापर्यंत पोहोचले.