जाहिरात

Akola News: पीक विम्यात शेतकऱ्यांची क्रूर थट्टा; अकोल्यात खात्यात जमा झाले फक्त 3, 5, आणि 21 रुपये 85 पैसे!

Akola News: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Akola News: पीक विम्यात शेतकऱ्यांची क्रूर थट्टा; अकोल्यात खात्यात जमा झाले फक्त 3, 5, आणि 21 रुपये 85 पैसे!
Akola News: 'ही मदत नसून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे,' अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
अकोला:


योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला

Akola News: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत (PMFBY) या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई म्हणून अवघे 3 रुपये, 5 रुपये, आणि 21 रुपये 85 पैसे इतकी अत्यल्प रक्कम जमा झाली आहे. दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्याच्या सरकारच्या आश्वासनानंतर मिळालेली ही तुटपुंजी मदत पाहून शेतकरी संतापले असून, 'ही मदत नसून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे,' अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

काय आहे प्रकरण?

सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस आणि मूग यांसारखी महत्त्वाची पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार, शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे तलाठ्याकडे सादर करून नुकसान भरपाईची सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती.

नुकसानभरपाईसाठी शासनाकडे निधी उपलब्ध असतानाही, प्रत्यक्ष रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेत जमा झाली नाही, अशी ओरड काही ठिकाणी आहे. काही ठिकाणी तलाठी आणि कर्मचाऱ्यांकडून कामात दिरंगाई झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी दिवाळीपूर्वी भरपाई मिळेल या आशेवर वाट पाहत होते.

( नक्की वाचा : Akola News : न्याय मिळेपर्यंत पाणीही नाही! अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचं आमरण उपोषण, कारण काय? )
 

मिळाली अत्यल्प रक्कम

पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा झाली. मात्र, ही रक्कम केवळ 3 रुपये, 5 रुपये, आणि कमाल 21 रुपये 85 पैसे इतकी अत्यल्प होती. अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान आणि त्या तुलनेत मिळालेली ही रक्कम पाहून शेतकरी अक्षरशः थक्क झाले. 'ही रक्कम म्हणजे आमची आर्थिक थट्टा आणि अपमान आहे,' अशी संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Latest and Breaking News on NDTV

या तुटपुंज्या मदतीमुळे संतापलेल्या दिनोडा, कावसा आणि कुटासा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयात तीव्र आंदोलन केले. आंदोलनादरम्यान, शेतकऱ्यांनी मिळालेल्या 21 रुपये 85 पैसे इतक्या रकमेचा चेक लिहून तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठवला. “अशा रकमेने कोणता दिलासा मिळणार? एवढ्या मोठ्या नुकसानीत काही रुपये कसे पुरणार? ही शेतकऱ्याची थट्टाच आहे,” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

Latest and Breaking News on NDTV

'अपमान करू नका'

या गंभीर प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून सरकारवरचा अविश्वास वाढला आहे. युवा काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “किमान शेतकऱ्याचा सन्मान होत नसेल, तरी अपमानही करू नका. ही मदत नव्हे, तर शेतकऱ्याची थट्टा आहे.” शासनाने तातडीने या रकमेचा पुनर्विचार करून न्याय्य भरपाई जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून शेतकऱ्यांना तात्काळ आणि प्रत्यक्ष दिलासा देण्यात यावा, अशी मागणी अकोला जिल्ह्यातील शेतकरी  करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com