Kalyan News: कल्याण पश्चिमेतील मच्छी मार्केट परिसरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या परिसरातील नशेखोरांच्या बेकायदेशीर कृत्यांना विरोध करणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले असून, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.या हल्ल्यामागे आणखी काही कारण आहे का? याचाही तातडीनं तपास होणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेकडील मच्छी मार्केट परिसरात काही नशेखोर तरुण वारंवार धुमाकूळ घालत असतात. त्यांच्या या कारवायांना स्थानिक रहिवाशांचा नेहमीच विरोध राहिला आहे. संबंधित पीडित कुटुंबीयांनीही या नशेखोरांविरोधात वारंवार तक्रारी केल्या होत्या आणि त्यांच्या बेकायदेशीर व्यवसायांना विरोध दर्शवला होता. याच रागातून या कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
( नक्की वाचा : Titwala News: टिटवाळ्यात 600 कोटींचा 'चाळ झोल';हातोडा पडला, तरी इमारत उभी! वाचा धक्कादायक सत्य )
छेडछाडीच्या तक्रारीचा संदर्भ
या हल्ल्याची पार्श्वभूमी काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेत दडलेली असल्याची शक्यता आहे. परिसरातील एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करण्यात आली होती, ज्याबाबत संबंधित कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
त्यावेळी पोलिसांनी काही कारवाई केली होती, मात्र नशा करणाऱ्यांनी त्या कुटुंबाला तेव्हापासूनच लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती असा आरोप होत आहे. नशेखोरांच्या कारभाराला विरोध केल्याचा बदला म्हणून मुलीची छेड काढण्यात आली होती की काय, असा संशय आता व्यक्त केला जात आहे.
( नक्की वाचा : Kalyan News:दुर्गाडीवर काय घडणार? नमाजसोबत मंदिरात प्रवेशासाठी 'शिवसेना-भाजपा'चा जोर; प्रशासनावर दबाव वाढला )
धारदार शस्त्रांनी कुटुंबावर हल्ला
घटनेच्या दिवशी आरोपींनी प्रथम कुटुंबातील एका महिलेला गाठून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिला वाचवण्यासाठी जेव्हा घरातील इतर सदस्य धावून आले, तेव्हा आरोपींनी त्यांच्यावरही तुटून पडले. या हल्ल्यात धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप जखमींनी केला आहे. या प्राणघातक हल्ल्यात काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी
या प्रकरणात बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी पीडित कुटुंब समाधानी नाही. वारंवार तक्रारी करूनही नशेखोरांवर कठोर कारवाई का केली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांच्या ढिसाळ कारवाईमुळेच आरोपींचे धाडस वाढले असून त्यांनी थेट घरात घुसून हल्ला करण्याची हिंमत केल्याचा आरोप जखमी कुटुंबीयांनी केला आहे.
कल्याणमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न
मच्छी मार्केटसारख्या गजबजलेल्या परिसरात अशा प्रकारे दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला झाल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी या नशेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून जोर धरत आहे. आता पोलीस या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना कधी बेड्या ठोकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.