अमजद खान, प्रतिनिधी
'आपल्याला मुलगी झाली हे पालकांना माहिती आहे. त्यानंतरही तिला तृतीयपंथीयांच्या (किन्नर) संस्थेकडं सोपवण्यात आलं. त्या मुलीला किन्नर समाजाकडं न देता, मला द्या. चांगल्या संस्थेला द्या अशी मागणी कल्याणमधील एका महिलेनं केली आहे. ही मागणी करणारी महिला कल्याणमधील एका नामांकित हॉस्पिटलची व्यवस्थापक आहे. या मुलीला परत पाठवण्यास किन्नर संस्था तयार नाही. ती त्यांच्याकडं सुरक्षित नाही, अशी भीतीही तक्रारदार महिलेनं व्यक्त केलीय. त्याचबरोबर या प्रकरणात पोलीस देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कल्याणमधील एका नामांकित रुग्णलायात कल्याण ग्रामीण परिसरातील म्हारळ परिसरात राहणाऱ्या एका जोडप्याला मुलगी झाली. या मुलीमध्ये काही हार्मोन्स विकसित झालेले नाहीत. ती तृतीयपंथीय असू शकते, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. हे ऐकून मुलीच्या आईवडिलांना धक्काच बसला. डॉक्टरांनी त्या बाळाची पुन्हा तपासणी केली. त्यामध्ये ती मुलगी असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतरही पालकांनी त्यांच्या मुलीला कल्याण पूर्वेतील एका किन्नर संस्थेला दिलं.
ज्या हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली त्यामधील व्यवस्थापक (HR) महिलेला हा प्रकार समजला. त्यांना तीन मुलं आहेत. त्यांनी मुलीला मला द्या. किन्नर संस्थेला देऊ नका, अशी विनंती केली. याबाबत या महिलेनं महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार देखील केली असून काही पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.
( नक्की वाचा : डोंबिवलीतील महिलेला मित्रासोबतची मस्ती नडली, तो वाचला ती मात्र... )
मुलीचे आई-वडील टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत असल्यानं टिटवाळा पोलिसही या प्रकरणात सहभागी झाले. त्यानंतरही या प्रकरणात पुढं काही झालं नाही, अशी तक्रार या महिलेनं केली आहे. मुलगी आहे तर ती मुलगी किन्नर संस्थेकडे देण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित करीत पालकांना मुलगी नको आहे का असा सवालही त्यांनी विचारला आहे.
मुलीचे वडील काय म्हणतात?
या प्रकरणात संबंधित मुलीच्या वडिलांनी त्यांची बाजू सांगितली आहे. त्यांनी दिलेल्या दाव्यानुसार, 'डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आम्ही घाबरुन मुलगी किन्नर संस्थेला दिली. आता आम्ही मागणी करुनही ते मुलगी आम्हाला परत देत नाहीत.' मुलीच्या वडिलांनी केलेल्या या दाव्यानंतर कल्याण पोलीस या प्रकरणात कधी हस्तेक्षप करणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.