Kalyan Attempt To Murder Case: दुकानदारांना नाहक त्रास,मारहाण करणाऱ्या गावगुंडांना विरोध केल्यामुळे भाजप पदाधिकारी विशाल जाधव आणि त्यांच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना कल्याण परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी सर्व आरोपींची धिंड काढली. गवती यादव, हृषिकेश पवार ,सुरेश चौधरी, रोहन बचूते, नितीन चौधरी, रवींद्र वाव्हळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर भावेश आणि हृषिकेश फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,परिसरातील दुकानदारांकडून जबरदस्तीने हप्ते वसुली,दुकानदारांना नाहक त्रास,नागरिकांना मारहाण करणे असे कृत्य गावगुंडांकडून केलं जातं. या गावगुंडांना संबंधित भाजप विशाल जाधव यांनी विरोध केला होता.याच रागातून आरोपींनी त्यांच्यावर आणि त्यांच्या वडिलांवर हल्ला चढवला.या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणच्या खडवलीत नदीकाठी भयंकर घटना, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातवरण
आरोपींची नेवाळी भागात धिंड काढली
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 6 आरोपींना अटक केली.तसेच परिसरात दहशत माजवणाऱ्या या आरोपींची नेवाळी भागात धिंड काढण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भोईर हा फरार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या शोध पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान,या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून आणि व्यापाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. या भागात भावेश भोईर या सराईत गुन्हेगाराची दहशत आहे याने एक टोळी तयार केली आहे, अशी माहिती आहे. या प्रकरणात भावेश शोधण्यासाठी दोन हिललाइन पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहे.