मनोज सातवी
विरारसह संपूर्ण राज्यात आणि देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या "सुटकेस मर्डर केस" अर्थात कविता बडाला हत्या प्रकरणी आज वसई न्यायालयात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मे 2016 मध्ये कविता बडाला या 27 वर्षीय विवाहितेची आर्थिक वादातून अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह बॅगमध्ये भरून डहाणू तालुक्यात जाळून टाकली होती. तसेच कविताची हत्या केल्यानंतरही तिच्या वडिलांकडून 30 लाख रुपये आणि 3 किलो सोन्याची खंडणी मागितली होती. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तीन पुरुष आणि एका महिला आरोपी विरोधात वसई न्यायालयात दोषारोप सिद्ध झाल्यामुळे वसई न्यायालयाने या चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कविता बडाला या 27 वर्षीय विवाहितेची या हत्याकांड प्रकरणी आरोपी, मोहितकुमार भगत, रामअवतार शर्मा,
शिवा रामकुमार शर्मा आणि युनिता शरवनंद या चार आरोपीना अर्नाळा पोलिसांनी सापळा रचून खंडणीचे पैसे स्वीकारताना अटक केली होती. दिनांक 15 मे 2016 रोजी घडलेल्या या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी सापळा रुचून 17 मे रोजी खंडणीची रक्कम स्वीकारताना आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. या सर्व आरोपींवर अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांना शिक्षा काय होते याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यात वसई न्यायालयाने आज या चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
काय आहे कविता बडाला हत्या प्रकरण?
विरारमध्ये राहणारी मयत कविता अशोक बडाळा वय 27 ही रत्नम इन्फोटेक कंपनीत चैन मार्केटिंग काम करत होती. आरोपी मोहीत कुमार, हा देखिल तिच्या सोबत काम करत होता. 15 मे 2016 या दिवशी आरोपी रामअवतार शर्मा आणि शिवा रामकुमार शर्मा हे कंपनीत मेंबर होणार होते. त्यामुळे कविताने सकाळी 9.15 वाजताच आपले घर सोडून ती विरार पश्चिमेला ग्लोबल सिटी परिसरातील आरोपी मोहीत कुमार याचे घरी गेली होती. मात्र कविता ही संध्याकाळपर्यंत घरी पोहोचलीच नाही. तसेच तिचा फोन देखिल बंद येत होता. दुसऱ्या दिवशी कविताची बहीण शितल कोठारी हिने अर्नाळा पोलीस ठाण्यात बहिण कविता हरविल्ची तक्रार दाखल केली होती. याबाबतची माहिती तिने वडील किशनलाल कोठारी यांना दिली. त्याच दिवशी सांयकाळी 6 वाजाता शितल हिला अंधेरी रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तर यांनी फोन करून कविताचा लॅपटॉप आणि इतर साहित्य असलेली बॅग अंधेरी स्थानकात सापडल्याचे सांगितले होते.
आरोपी मोहितकुमार भगत याच्याकडून रत्नम इन्फोटेक कपंनीच्या आर्थिक व्यवहाराचे घेतलेले पैसे कविता बडला हिने परत केले नव्हते. या कारणावरून मोहितकुमार भगत याने कविताचा गळा दाबुन हत्या केली होती. त्यावेळी आरोपी रामअवतार शर्मा, शिवा शर्मा यांनी या हत्येत मदत केली होती. शिवाय आरोपी युनिता शरवन हीने ही आरोपींना सहकार्य केले होते. त्यानंतर शिव शर्मा याने कविताची बॅग अंधेरी स्थानकात सोडून दिली होती. पुढे आरोपींनी भाडयाने गाडी आणली. त्या गाडीच्या डिकीत कवीताचे प्रेत ठेवले. त्या आधी हे प्रेत त्यांनी एका बॅगमध्ये ठेवले होते. पुढे ही बॅग एका घाटा टाकण्यात आली. शिवाय ती पेट्रोल टाकून जाळण्यात ही आली.
पुढे 17 मेला कविताच्या मोबाईल फोन वरून तिचे वडील किशनलाल यांना फोन करण्यात आला. पण फोन वर आरोपी होते. त्यांनी तु कविताचा बाप बोलत आहेस ना? तुझी मुलगी सुरक्षित आहे. मात्र जास्त हुशारी दाखवू नकोस. मुलगी सुरक्षित पाहीजे असेल तर आम्हाला तीस लाख रुपये आणि तीन किलो सोनं हवं आहे. आम्ही परत फोन करू. कुठे पैसे द्यायचे आहेत ही जागा सांगू असं सांगत त्यांनी फोन ठेवून दिला होता. त्यानंतर आरोपींनी पुन्हा फोन केला. सांगितलेली रक्कम आणि सोनं घेवून विरारकडून सुरतच्या दिशेने निघ असं त्यांना सांगण्यात आलं. येताना एकटं येण्यास सांगितलं. गाडी घेवून ये. शिवाय कोणत्या गाडीतून येणार आहे त्याचा नंबर एसएमएस कर असंही सांगण्यात आलं. नाही तर तुझ्या मुलीचे प्रेत तुला मिळेल अशी धमकी ही देण्यात आली. याबाबतचा गुन्हा अर्नाळा पोलिस स्थानकात दाखल करण्यात आला होता.
त्यावेळी अर्नाळा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी एपीआय संदीप शिवळे आणि पोलीस निरीक्षक खोले यांच्या पथकाने जबरदस्त कामगिरी केली. आरोपींसाठी सापळा रचत त्यांनी खंडणीची रक्कम स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडले होते. अत्यंत किचकट अशा हत्या प्रकरणात फिर्यादींची बाजू सरकारी वकील जयप्रकाश पाटील यांनी कोर्टासमोर अत्यंत प्रभावीपणे मांडली. त्यात तब्बल 53 साक्षीदारांची पडताळणी करून चारही आरोपींवरील आरोप सिद्ध झाले आहेत.