यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune Crime News Today : कोथरूड परिसरात जुन्या वादातून मारहाणीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोथरूड येथील श्रावण धारा वसाहत,न्यू शांतीनगर येथील धनंजय सोसायटीमध्ये हा प्रकार घडला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून ही मारहाण झाली. सूरज कदम नावाच्या व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप आहे. तो एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या जवळचा असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो मारहाण करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे, असा दावा केला जात आहे.
सोसायटीतील घरांची कोयत्याने केली तोडफोड
यापूर्वी चार दिवसांपूर्वी झालेल्या वादातून तेजस कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी सोसायटीतील घरांवर कोयत्याने तोडफोड केल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच राहुल गायकवाड याला सोसायटीमध्ये घुसून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशन येथे तेजस कांबळेसह सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Shirdi News: अशोक खरातचं शिर्डी कनेक्शन आलं समोर, शिर्डी अन् परिसरात असं काही केलं..सर्वत्र उडालीय खळबळ!
मात्र,मारहाणीत सहभागी असलेल्या सुरज कदमवर कारवाई न झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. मारहाण आणि तोडफोडीचे सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.