आधी लेकीसाठी इडली आणली अन् ओढणीने गळा आवळला; नंतर बापाचीही आत्महत्या

कर्जबाजारीपणा आणि घरगुती वादातून एका बापाने आपल्या सहा वर्षांच्या लेकीची ओढणीने गळा आवळून अत्यंत निघृणपणे हत्या केली अन् त्यानंतर स्वत:चाही जीव घेतल्याचा भीषण प्रकार लातूरमध्ये घडला.

जाहिरात
Read Time: 2 mins

लातूर : कर्जबाजारीपणा आणि घरगुती वादातून एका बापाने आपल्या सहा वर्षांच्या लेकीची ओढणीने गळा आवळून अत्यंत निघृणपणे हत्या केली अन् त्यानंतर स्वत:चाही जीव घेतल्याचा भीषण प्रकार लातूरमधील कोरे गार्डन परिसरातील एका इमारतीत घडला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचतेतून अभय भूतडा यांने जीवघेणं पाऊल उचललं आहे. 

20 मार्च रोजी सकाळी 9 वाजता अभयने आपली 6 वर्षांची लेक नव्या भूतडासाठी इडली खरेदी केली. तिला शाळेत सोडलं. काही वेळानंतर तो पुन्हा शाळेत गेला आणि लेकीला घरी नेलं. यानंतर अभयने आपल्या सहा वर्षांच्या लेकीची गळा दाबून हत्या केली आणि काही वेळाने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. लातूरमधील कोरे गार्डन परिसरातील एका इमारतीत हा प्रकार घडला. 

Advertisement

आत्महत्येच्या या घटनेनं लातूर शहर हादरलं आहे. कर्जबाजारीपणा, आर्थिक चणचण आणि घरगुती वाद या घटनेमागील कारण असल्याचं सांगितलं जात आहे. अभय भुतडा हे कोरे गार्डनशेजारी भाड्याच्या घरात पत्नी सुनयना आणि सहा वर्षांच्या लेकीसोबत राहत होते. त्यांच्या पत्नीचं माहेर याच परिसरात आहे. चार दिवसांपासून पत्नी सुनयना ही नव्याला घेऊन माहेरी गेली होती. बुधवारी सकाळी नव्याला शाळेत सोडतो असं सांगून अभय तिला सोबत घेऊन गेले होते. त्यानंतर सकाळी 10 वाजता सासरे आणि सुनयना यांनी अनेकदा फोन केला.  परंतू ते फोन उचलत नव्हते. शेवटी सासरे गोविंद मुंदडा त्यांच्या घरी गेले. यावेळी घराचं दार आतून बंद होतं. आवाज दिल्यानंतरही अभय दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नव्याला घरी आणल्यानंतर अभय याने लाल रंगाच्या ओढणीने तिचा गळा आवळून हत्या केली, नंतर लोखंडी कडीला ओढणीने स्वत: गळफास घेतला. 

Advertisement

कर्जबाजारीपणामुळे अभय अस्वस्थ...
अभय भुतडा यांनी परिसरातच कोरे गार्डनसमोर अवंती नाश्ता सेंटर सुरू केले होते. मात्र गेल्या चार महिन्यांपासून त्यांना आर्थिक चणचण भेडसावत होती. कर्जबाजारीपणामुळे ते अस्वस्थ असल्याची माहिती अभय यांचे सासरे गोविंद मुंदडा यांनी पोलिसांना दिली आहे. अभय आणि सुनयना यांच्यात सतत वाद होत होते. मात्र वादाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अभयच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी त्यांच्या आई-वडिलांना सांगण्यात आले होते. मात्र प्रकृती अस्वास्थाचं कारण सांगत त्यांनी येण्यास नकार दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

Advertisement