
सुनील कुमार कांबळे
लातूर जिल्ह्यातल्या करकट्टा या गावांमध्ये आपल्या आईचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याने, मुलानेच आईच्या प्रियकराचा काटा काढला. यानंतर संबंधित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे लातूर शहरांमध्ये खळबळ उडाली आहे. लातूर शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या करकट्टा गावामध्ये हे धक्कादायक घटना घडली आहे.या गावामध्ये अठरापगड जातीतील लोक हे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. प्रेमाला वय नसतं अगदी तसंच या गावाला अनुभवायला भेटलं आहे. करकट्टा गावातील शरद इंगळे वय 40 वर्ष हा गावा नजीकच असलेल्या एका खडी केंद्रावर मॅनेजर म्हणून काम करत होता. याच खडी केंद्रावर बाळासाहेब शिंदे हा काम करायचा. त्यावेळी बाळासाहेब शिंदे याची पत्नी सखुबाई त्याला जेवणाचा डबा देण्यासाठी नेहमी यायची. त्यातूनच मॅनेजर असलेला शरद आणि सखुबाईचं सुत जुळलं. दोघांमध्ये जवळीकता अधिकच वाढत गेली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जीवन मरणाच्या शपथा दोघेही घेत होते. ऐवढेच नाही तर गेल्या सहा महिन्यापूर्वी दोघेही गावातून पळून गेले होते. आपल्या आईचे गावातील परपुरुषाशी असलेले संबंध हे तिचा मुलगा रोहित शिंदे याला खटकत होते. शिवाय समाज आणि नातेवाईकांमध्ये होत, असलेली बदनामी त्याला सहन होत नव्हती. त्यातूनच आईचा प्रियकर असलेल्या शरद इंगळेला संपवण्याचा कट रचण्यात आला. शरद इंगळे हा नेहमीप्रमाणे खडी केंद्रावर कामावर होता. ठरल्याप्रमाणे त्या महिलेचा मुलगा रोहित शिंदे, पती बाळासाहेब शिंदे, रोहन शिंदे, भरत शिंदे हे सर्वच जण शरदला संपवण्यासाठी थेट त्याच्या कामावर गेले.
खडी केंद्रावर काम करत असलेल्या शरद इंगळेला त्यांनी धक्काबुक्की करत मारण्यास सुरुवात केली. ठरवल्या प्रमाणे कोयता ते सोबत घेवून आले होते. त्याच कोयत्यांनी शरद इंगळेवर भर रस्त्यात वार करण्यात आले. वार इतके धारदार होते की त्यामध्ये त्याचा जीव गेला. शरद इंगळे याला कोयत्याने मारल्याची घटना त्याच्या पत्नीला आई-वडिलांना ज्यावेळी समजली त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. जोपर्यंत आरोपीला अटक केली जाणार नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका शरद इंगळेच्या नातेवाईकांनी घेतली.
त्यामुळे हत्या झाल्यानंतर तब्बल तीन तास शरद इंगळेचा मृतदेह हा रस्त्यावरच होता. शरद इंगळेच्या पत्नीच्या तक्रारीवरून मुरुड पोलीस ठाण्यामध्ये रोहित शिंदे ,रोहन शिंदे, बाळासाहेब शिंदे,भरत शिंदे, सखुबाई शिंदे या सर्वांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. हत्येच्याच दुसऱ्या दिवशी मात्र प्रियसी सखुबाई शिंदेने सुद्धा आत्महत्या केली. आपल्या नावाची बदनामी झाल्याचं तिला सहन झालं नाही. त्यामुळे तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. या घटनेमधील चार आरोपी मुरुड पोलिसांच्या ताब्यात सध्या आहेत.
या सर्व घटनेचा अधिक तपास मुरुड पोलीस करत आहेत. अनैतिक संबंधातून दोन घरांचा संसार उघड्यावर पडला आहे. दोन हसती खेळती कुटुंब एका क्षणात होत्याचं नव्हते झाले आहेत. अनैतिक संबंधातून अनेक हत्या करण्याच्या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसाच प्रकार आता लातूरमध्ये ही घटला आहे. या प्रकरणामुळे करकट्टा गाव मात्र हादरून गेले आहेत. शिवाय पोलिसही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपींनी ताब्यात घेण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world