- लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एका व्यक्तीला कारमध्ये कोंबून जिवंत जाळल्याची भयंकर घटना घडली होती
- मृतदेह गणेश चव्हाण याचा असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला गेला, पण पोलिस तपासात तो बनाव उघड झाला
- गणेश चव्हाणने टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी हा कट रचला
त्रिशरण मोहगावकर/ विष्णू बुरगे
लातूर जिल्ह्यातील औसा इथं एका कारमध्ये एका व्यक्तीला कोंबण्यात आलं. त्यानंतर त्याला जिवंत जाळल्याची घटना समोर आली होती. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना लातूरच्या औसा तालुक्यात घडली होती. वानवडा रस्त्यावर रात्री बाराच्या सुमारास घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेत एका व्यक्तीला आधी पोत्यात भरलं. नंतर कारमध्ये कोंबलं आणि जिवंत अवस्थेतच कारला आग लावून जाळलं. या घटनेत व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. मृतदेह जळून राख झाला.तिथेच पडलेल्या कड्यावरून हा मृतदेह गणेश चव्हाण याचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पण पोलिसांच्या तपासाची चक्रं फिरलं आणि हादरवणाऱ्या या हत्याकांडात नवा ट्विस्ट आला.
गाडीतला मृतदेह गणेश चव्हाण नसूल गोविंद यादव नावाच्या एका निष्पाप व्यक्तीचा असल्याचं पोलिसांचा तपासात समोर आलं. गाडीतला मृतदेह गणेश चव्हाण याचाच असल्याचा भासवण्याचा पुरेपर प्रयत्न केला गेला. पण पोलिसांच्या तपासात हा हत्येचा बनाव असल्याचं उघड झालं. हा बनाव गणेश चव्हाण यानेच केला होता. आपला अपघाती मृत्यू झाल्याचं त्याला दाखवायचं होतं. गणेशने एक कोटींचा टर्म इन्शुअरन्स काढला होता. पैसे मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्याच हत्येचा बनाव केला.
गणेशला याकतपूर रोड इथं गोविंद यादव नावाचा व्यक्ती भेटला. तो दारू प्यायला होता. त्याने गणेशकडे लिफ्ट मागितली. गणेशने या गोविंदला लिफ्ट दिली. गोविंद इतका नशेत होती की त्याला धड बसता येत नव्हते. त्याच वेळी गणेशच्या डोक्यात ही भयंकर कट शिजला. त्याने गोविंदला जेवणासाठी विचारलं. गोविंद ही चिकन खाणार असं म्हणाला. मग गोविंदसाठी एका धाब्यावरून चिकन घेण्यात आलं. ते चिकन गोविंदने खाल्लं त्यानंतर तो गाढ झोपी गेला. त्याच अवस्थेत त्याने गोविंदला ड्रायव्हींग सीटवर ठेवले. त्याला सीटबेल्ट लावला. त्यानंतर आपल्या हातातील कडं गोविंदच्या हातात घातलं. नंतर वानवडा फाट्या जवळ गाडीला पेटवून दिलं आणि स्वतःचीच हत्या असल्याचा बनाव केला.
गणेश चव्हाण या हत्येनंतर औसातून पसार झाला. तो आधी तुळजापूर मोडपर्यंत चालत गेला. नंतर कोल्हापूर मार्गे गणेश सिंधुदुर्गात जाऊन लपला. सर्व काही गणेशने ठरवलेल्या प्लॅन नुसार होतं होतं. गणेशचा जळून मृत्यू झाल्याची बातमी पसरली होती. गणेश मेला असचं सर्वांनी गृहीत धरलं होतं. पण गणेशला त्याची एक चुक महागात पडली. त्यामुळे त्याचा प्लॅन फसला. तो प्लॅन फसण्याचं कारण होतं त्याने केलेला एक फोन कॉल. गणेशने सगळ्या प्रकारानंतरही एका नंबरवरून आपल्या प्रेयसीसोबत संपर्कात होता.
पोलिसांनी कॉल डिटेल तपासल्यानंतर गणेश प्रेयसीच्या संपर्कात होता हे समोर आलं. त्याच्याच आधारे पोलिसांनी कोल्हापूर गाठलं. पुढे सिंधुदुर्गच्या परिसरातच गणेश लातूर पोलिसांच्या कचाट्यात सापडला. गणेश चव्हाणने एक कोटींच्या टर्म इन्शुअरन्सचे पैसे मिळवण्यासाठी एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला होता. पण ज्या प्रेयसीसाठी गणेशने हा कट रचला त्याच प्रेयसीला केलेल्या फोनने त्याचं बिंग फुटलं. आधी गणेशचा या अपघातात मृत्यू झाल्याचं सर्वांना वाटलं होतं. त्याच्या नातेवाईक मित्रांनी तर त्याला श्रद्धांजलीही वाहीली होती. पण हा प्रकार उघड झाल्यानंतर सर्वच जण हादरून गेले आहे.