
संजय तिवारी, प्रतिनिधी
Yavatmal News : यवतमाळ शहरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. त्यांनी लॉरन्स बिश्नोई टोळीचा (Lawrence Bishnoi Gang) मोस्ट वाँटेड गँगस्टर भुपेंद्र सिंह उर्फ उर्फ 'भिंडा' याला अटक केली आहे. राजस्थान पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी 25,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार यवतमाळ शहरात अंमली पदार्थविरोधी मोहीम सुरू आहे. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की भुपेंद्र सिंह हा यवतमाळच्या जांब रोड परिसरात भाड्याच्या घरात बनावट नावाने राहत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी दांडेकर ले-आउट येथील एका घरावर छापा टाकून संशयिताचा शोध घेतला.
छाप्यादरम्यान पोलिसांची चाहूल लागताच भुपेंद्र सिंह पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने खोटी माहिती दिली, पण पोलिसांनी केलेल्या कडक चौकशीत त्याने आपली खरी ओळख उघड केली. त्याचे पूर्ण नाव भुपेंद्र सिंह उर्फ भिंडा जरनैल सिंह (वय 35, रा. अहारना खर्द, पोस्ट मेहटीयाना, होशियारपूर, पंजाब) असे आहे.
( नक्की वाचा : Santosh Ladda : जीवलग मित्रानेच केला घात... छत्रपती संभाजीनगरच्या दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट )
भुपेंद्र सिंह याने कबूल केले की तो लॉरन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर टोळीचा सक्रिय सदस्य आहे. त्याच्यावर पंजाब आणि राजस्थान राज्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, शस्त्रास्त्र अधिनियम अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. विशेषतः, 2023 साली बाडनेर येथे हरपालसिंग उर्फ रिंक या व्यक्तीच्या खुनात तो सहभागी होता.
यवतमाळ पोलिसांनी तत्काळ पंजाब व राजस्थान पोलिसांशी संपर्क साधून भुपेंद्र सिंहवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली आहे. सध्या त्याला अधिक तपासासाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world